शिरगाव-तिवंदेवाडीतील तीन गृहनिर्माण संस्थांना जमिनींचे कायदेशीर मालकी हक्‍क प्राप्त

रत्नागिरी:- शहरानजिकच्या शिरगाव-तिवंदेवाडीतील गृहप्रकल्पामधील तीन योजनांमधील इमारतींच्या गृहनिर्माण संस्थांना अभिहस्तांतरण (डीम्ड कन्वेयन्स) पत्र देण्याचा निर्णय जिल्हा उपनिबंधकांनी दिला. त्यामुळे या तीन गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या योजनांतील जमिनींचे कायदेशीर मालकी हक्‍क प्राप्त झाले आहेत. 

तिवंदेवाडीतील गृहनिर्माण प्रकल्पात अनेक इमारतींचा समावेश आहे. त्यामध्ये काही इमारती पूर्ण झाल्या आहेत. यातील तीन गृहनिर्माण संस्थांनी विकासकाकडे जमीन मालकीचे हस्तांतरण करून देण्यासाठी पाठपुरावा केला. परंतु, विकासक अपेक्षीत प्रतिसाद देत नसल्याने या संस्थांनी जिल्हा उपनिबंधकांकडे मानीव अभिहस्तांतरण अर्ज दाखल केला. या तिन्ही गृहनिर्माण संस्थांच्यावतीने अ‍ॅड. निलांजन नाचणकर यांनी शासकीय नियमांचा दाखला देत हे अभिहस्तांतरण विकासकावर कसे बंधनकारक आहे हे पटवून दिले.

जिल्हा उपनिबंधकांकडे सुनावणी कार्यवाही झाल्यानंतर जिल्हा उपनिबंधक अशोक गार्डी यांनी तिन्ही योजनांमधील संस्थांना अभिहस्तांतरण पत्र देण्याचा निर्णय दिला. त्यामुळे आता या गृहनिर्माण संस्थांना त्या जमिनींचे कायदेशीर हक्‍क प्राप्त झाले असून, त्याची शासकीय अभिलेखात नोंदही झाली आहे. या निर्णयामुळे या तीन इमारती ज्या जमिनीवर उभ्या राहिल्या आहेत त्या जमिनीचे कायदेशीर मालक बनले आहेत.