पाटबंधारे प्रकल्पासाठी 15 हजार कोटी: ना. जयंत पाटील 

रत्नागिरी:- जलसंपदा विभागांतर्गत रत्नागिरीसह कोकणातील अनेक प्रकल्प निधी अभावी रखडले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. पाटबंधारे प्रकल्पांसाठी राज्य सरकार १५ हजार कोटी रुपये उभे करणार आहे. हा निधी उपलब्ध झाल्यानंतर प्राधान्याने कोकणातल्या प्रकल्पांसाठी निधीची आर्थिक तरतूद येणार्‍या अर्थसंकल्पात केली जाईल. महाविकास आघाडीचे सरकार कोकणाला न्याय देताना विकासाचा बॅकलॉग भरून काढेल  असा विश्वास जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. तर महाविकास आघाडीचे सरकारमध्ये तीन पक्ष सहभागी आहेत. स्थानिक स्तरावर पक्षा-पक्षांमध्ये असलेले मतभेद यापुढील काळात दूर केले जातील असेही ना.पाटील यांनी स्पष्ट केले.
       

कोकणच्या दौर्‍यावर असलेल्या जलसंपदा मंत्री  ना.जयंत पाटील यांनी शनिवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. जलसंपदा मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून आपण खात्याबरोबरच पक्षाच्या वाटचालीचा आढावा घेतला आहे. यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपण आढावा घेण्यासाठी जाणार आहोत असे ते म्हणाले.

रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातील जलसंपदा विभागाचे अनेक प्रकल्प निधीअभावी सुरू झाले नाहीत. कोकणात मोठ्या प्रमाणात विकासाच बॅकलॉग आहे. महाविकास आघाडी सरकार तो बॅकलॉग भरून काढण्यासाठी प्रयत्नशील आहे. कोकणातील प्रकल्पांसाठी आवश्यक निधी देण्यासाठी राज्य सरकार १५ हजार कोटी रुपये उभे करणार आहे. हा निधी उपलब्ध झाल्यानंतर येथील प्रकल्पांना प्राधान्य देत निधीची तरतूद तात्काळ केली जाईल. सध्या कोरोनामुळे राज्य सरकार आर्थिक संकटात आहे. कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी कर्ज काढावे लागत आहे. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने भविष्यात राज्य सरकार आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल. त्यावेळी कोकणच्या विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही ही अशी ग्वाही ना. जयंत पाटील यांनी दिली. नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध होता. त्यांच्याच नेतृत्वाखाली आज आम्ही सत्तेमध्ये आहोत. पर्यावरणाला धोका असल्याने स्थानिक जनतेने या प्रकल्पाला विरोध केला होता. आज प्रकल्पाचे समर्थन करणारे स्थानिक ग्रामस्त वाढत आहेत. या प्रकल्पाचा अभ्यास करून निर्णय घेणे आवश्यक आहे, तर प्रत्येक भागात प्रकल्पाचे स्वागत होणे  गरजेचे आहेच, परंतु त्याच्या दुष्परिणामाचा अभ्यास करणे तेवढेच महत्त्वाचे असल्याचे ना.पाटील यांनी सांगितले.

विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या निवडीकरता मंत्रीमंडळाने बारा जणांची यादी राज्यपाल महोदयकडे सादर केले आहे. याबाबत पंधरा दिवसात निर्णय घ्या, ही विनंती ही राज्य सरकारने राज्यपालांना केली आहे. त्यामुळे राज्यपाल वेळेत योग्य निर्णय घेतील असा आपल्या सरकारला विश्वास असल्याचे ना. पाटील यांनी सांगितले.
सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात गैर काय आहे? खासदार सुनील तटकरे यांनी अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवले सोडविले, तर त्यात चूक काय? लोकप्रतिनिधी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असतात. खा. तटकरे उत्तम काम करत आहेत. लोकप्रतिनिधींचा मानसन्मान ठेवण्याचे गांभीर्य सर्वांनाच हवे आहे, असे सांगत आमदार योगेश कदम यांनी खा.तटकरे यांच्या विरोधात मांडलेल्या हक्कभंग प्रस्ताव बाबत आपण अनभिज्ञ असल्याचे ना. पाटील यांनी  सांगत खा.तटकरे यांची त्यांनी पाठराखण केली.

कोकणात राष्ट्रवादी पक्ष उभारी घेत आहे. प्रत्येक सेलचे कार्यकर्ते पदाधिकारी उत्तम काम करत आहेत. आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात उत्तम काम सुरू असून,  शेखर निकम यांचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे ना.पाटील यांनी  सांगितले.
या पत्रकार परिषदेला पर्यटन राज्यमंत्री  ना.आदिती तटकरे, आमदार शेखर निकम,  जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, प्रदेश चिटणीस सुरेश बने, माजी जिल्हाध्यक्ष कुमार शट्ये, सुदेश मयेकर, निलेश भोसले, महिला जिल्हाध्यक्ष चित्रा चव्हाण आदी उपस्थित होते.