जिल्ह्यात नेमणार 2 हजार 71 बालरक्षक 

रत्नागिरी:- शिक्षण हक्क कायद्यानुसार 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालकाला नियमित शिक्षण मिळणे आवश्यक आहे. करोनाप्रतिबंधक लॉकडाउन शिथिल केल्यानंतर पालकांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. त्यामुळे विद्यार्थी शाळाबाह्य होण्याची शक्यिता आहे. विद्यार्थ्यांचे पालकांसोबतचे स्थलांतर रोखण्यासाठी ‘एक गाव एक बालरक्षक’ मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील दोन हजार 71 ठिकाणी बालरक्षक नेमले जाणार आहेत.                                                                         

यावर्षी करोनामुळे आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. अनेक नियमित विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत असले, तरी करोनामुळे रोजगाराची समस्या निर्माण झाल्याने गावातील मजुरी करणाऱ्यांचे स्थलांतर वाढले आहे.या पालकांसोबत जाणाऱ्या विद्यार्थ्याचे स्थलांतर रोखण्यासाठी ‘एक गाव एक बालरक्षक’ मोहीम शासनाने हाती घेतली आहे. त्यातून करोना परिस्थितीमुळे मुले शाळाबाह्य राहू नयेत, यासाठी गावपातळीवर विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. शिक्षणाचा मोफत व सक्तीचा अधिकार अधिनियमानुसार तीस दिवसांपेक्षा जास्त दिवस विद्यार्थी शाळेत उपस्थित नसेल, तर तो शाळाबाह्य ठरतो. पालकांच्या स्थलांतरामुळे अशा शाळाबाह्य झालेल्या मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी 9 जानेवारी 2017 रोजी तत्कालीन शिक्षण सचिव नंदकुमार यांनी राज्यात बालरक्षक कृती कार्यक्रम सुरू केला. त्यानुसार बालरक्षक कृती कार्यक्रम राबविला जात आहे.

दरवर्षी नोकरीनिमित्त अनेक पालक परजिल्ह्यात स्थलांतर होतात. पाल्याची गैरसोय होऊ नये, म्हणून पालक त्यांनाही सोबत घेऊन जातात. हे विद्यार्थी कालांतराने शाळाबाह्य होतात. त्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांनी याबाबतचे पत्र जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी पंचायत समित्यांमार्फत सर्व शिक्षकांना पाठविले आहे.                             

रत्नागिरी जिल्ह्यात पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण देणाऱ्या एकूण तीन हजार 201 शाळा असून त्यापैकी जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत दोन हजार 571 शाळा आहेत. त्या गावागावांमध्ये वाडीवस्त्यांवर विखुरल्या आहेत. त्या प्रत्येक शाळेच्या अखत्यारीत शाळाबाह्य मुलांचा शोध घेतला जाणार आहे. त्याकरिता प्रत्येक शाळेतील बालरक्षक म्हणून काम करणार असून एक स्वयंसेवी बालसेवक नियुक्त केला जाणार आहे. तो आपल्या परिसरातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेणार असून त्याची माहिती शाळेला देईल. त्यानंतर शाळेचे व्यवस्थापन त्या विद्यार्थ्याला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न करेल. याशिवाय शालेय व्यवस्थापन समिती, पालक मेळावे, मातापालक संघ तसेच सहविचार सभांमध्ये शाळाबाह्य मुलांची माहिती देतील. शिक्षक आणि मुख्याध्यापक त्यांना त्यासाठी मदत करतील. मुलांनी नियमित शाळेत यावे, शाळेतील विषयांची क्षमता मिळवावी, त्यांचे योग्य पोषण व्हावे यासाठीही शिक्षकांनी तसेच बालरक्षकांनी काम करावे, अशी अपेक्षा आहे. वयानुरूप दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना शालेय विषयांमधील किमान मूलभूत क्षमता प्राप्त होईल, याकडेही बालरक्षक आणि शिक्षकांनी लक्ष द्यावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. आवश्यकतेनुसार विविध ठिकाणी हंगामी वसतिगृहे स्थापन केली जातील. तसेच अशा विद्यार्थ्यांची शिक्षणासह राहण्याची, जेवणाची सर्व व्यवस्था केली जाणार आहे.