अधिव्याख्यात्यांवर उपासमारी, बेरोजगारीची वेळ

रत्नागिरी:- आज सुमारे 15 महिने उलटलेत…सद्या शासकीय तंत्रनिकेतन संस्था सुरू नाहीत. राज्यातील सर्व अधिव्याख्यात्यांवर उपासमारीची व बेरोजगारीची वेळ आलेली आहे. आता तर दिवाळी देखील तोंडावर आलेली असताना हातात पगार नाही, अशी कठीण अवस्था निर्माण झाल्याने रत्नागिरीसह राज्यातील सर्व अधिव्याख्याते आर्थिक संकटात सापडलेले आहेत. 
 

रत्नागिरीसह राज्यभरातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये तासिका तत्वावर कार्यरत अभ्यागत अधिव्याख्यात्यांची अवस्था अशीच झाली आहे. या अधिव्याख्यात्यांना मानधनाविनाच फुकट राबवून घेण्यात आले. त्याकडे शासनाच्या संबधित उच्च व तंत्र शिक्षण विभागानेही पूर्णत डोळेझाक केल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विविध जिल्हास्तरावरून या विभागाचे संबंधित मंत्र्यांना वेळोवेळी निवेदने त्याबाबत गाऱ्हाणी मांडण्यात आलेली आहेत. पण अजूनही त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचे सांगितले जात आहे. शासकीय तंत्रनिकेतमध्ये संस्था स्तरावर शासनाच्या निर्देशापमाणे तासिका तत्वावर अधिव्याख्याते नियुक्त केले जातात. त्या अधिव्याख्यांताना तासिका तत्वावर मानधन दिले जाते. रत्नागिरीतही अशा पकारे 50 हून अधिक अभ्यागत अधिव्याख्याते आहेत. अधिव्याख्यात्यांचे शैक्षणिक वर्ष 2019-2020 च्या पूर्ण वर्षांचे मानधन अद्याप झालेले नाही. त्यासाठी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. पण शासन, संबधित तंत्रनिकेतन व्यवस्थापनाकडूनही दाद मिळालेली नाही. अशा परिस्थितीत कोरोना लॉकडाऊनचा काळ सुरू झाला. या लाॅकडाऊन काळात मानधनाविना आर्थिक बाजू व जगणे अधिव्याख्यात्यांना बिकट अवस्थेतून जावे लागत आहे. अधिव्याख्यात्यांनी या प्रलंबित मानधनाविषयी वेळोवेळी त्या खात्याचे मंत्री, सचिव यांच्याकडेही दाद मागितली. त्यानंतर सचिव स्तरावरून एक परिपत्रक काढून प्राचार्यांना पीएलए फंडातून थकीत वेतन करण्याच्या सूचना केल्या होत्या.  राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचीही भेट घेण्यात आली. राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागस्तरावर उपसचिवांनी कार्यवाही करण्याच्याही सूचना लाॅकडाऊनपूर्वी देण्यात आल्या होत्या. अजूनही त्याबाबत कार्यवाहीचे घोडे अडलेले आहे. एकीकडे शासकीय तंत्रनिकेतनच्या परिसरात लवकरच परदेशाच्या धर्तीवर आमुलाग्र बदल करण्याबाबत पावले उचलली जात आहेत. पण या अधिव्यख्यात्यांच्या थकलेल्या मानधनाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने या अधिव्यख्यात्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.