मुंबई इंडियन्सचा दिमाखात या वर्षीच्या आयपीएलच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश

मुंबई:- मुंबई इंडियन्सने दिमाखात या वर्षीच्या आयपीएलच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता यंदाची आयपीएल मुंबई इंडियन्सचं जिंकणार असे काही जणांना वाटत आहे. त्यासाठी आतापर्यंतची मुंबईची अंतिम फेरीतील कामगिरीही भन्नाट झालेली पाहायला मिळाली आहे. त्यामुळे यावर्षीही मुंबईचं आयपीएल जिंकणार असेल, असे म्हटले जात आहे. मुंबईचा संघ यावेळी सहाव्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.

गेल्यावर्षीही मुंबईने आयपीएलचे जेतेपद पटकावले होते. मुंबईचे हे चौथे जेतेपद होते आणि आयपीएलच्या जेतेपदांचा चौकार लगावणारा तो पहिला संघ ठरला होता. गेल्यावर्षीच्या आयपीएलच्या अंतिम फेरीत मुंबईपुढे आव्हान होते ते महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सचे. या अंतिम फेरीत मुंबईने फक्त एका धावेने चेन्नईवर विजय मिळवला होता. या एका धावेच्या विजयाच्या जोरावर त्यांनी जेतेपदही आपल्या नावावर केले होते.
त्यापूर्वी मुंबईच्या संघाने २०१७ साली आयपीएलच्या जेतेपदाला गवसणी घातली होती. हे मुंबईचे तिसरे जेतेपद होते. यावेळी मुंबईच्या संघाला अंतिम फेरीत आव्हान दिले होते ते रायझिंग पुणे जायटंस् या संघाने. हा अंतिम फेरीचा सामना चांगलाच रंगतदार झाला होता. या अंतिम सामन्यातही मुंबईने फक्त एका धावेने विजय मिळवला आणि जेतेपद आपल्या नावावर केले होते.

मुंबई इंडियन्सचा संघ यापूर्वी २०१३ साली आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला होता आणि त्यांनी चषकावर आपले नाव कोरले होते. मुंबईचे हे दुसरे जेतेपद होते. यावेळी झालेल्या अंतिम सामन्यात मुंबईने पुढे चेन्नईसुपर किंग्स संघाचे आव्हान होते. या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २०२ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या संघाला १६१ धावांवर समाधान मानावे लागले होते. यावेळी मुंबईच्या संघाने ४१ धावांनी चेन्नईवर मात करत जेतेपद पटकावले होते.
मुंबई इंडियन्सने आपले पहिले आयपीएलचे जेतेपद २०१३ साली पटकावले होते. यावेळी झालेल्या अंतिम फेरीत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन्ही संघ आमने-सामने होते. यावेळी मुंबईच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना १४८ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या संघाला १२५ धावांवर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे मुंबईने अंतिम फेरीत २३ धावांनी विजय मिळवत जेतेपदाला गवसणी घातली होती. यापूर्वी मुंबईचा संघ २०१० सालीदेखील अंतिम फेरीत पोहोचला होता. यावेळी मुंबईपुढे चेन्नईचे आव्हान होते. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना १६८ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना १४६ धावा करता आल्या होत्या. त्यामुळे मुंबईला या अंतिम फेरीत पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे आतापर्यंत पाचवेळा मुंबईचा संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे, तर त्यांनी चारवेळा जेतेपद पटकावले आहे.