संगमेश्वर ते गणपतीपुळे रस्त्याला राज्यमार्गाचा दर्जा

गणपतीपुळेला जाण्यासाठी 40 किमी अंतर कमी होणार

रत्नागिरी:- जिल्ह्यातील संगमेश्वर ते जाकादेवी रस्त्याला राज्यमार्गाचा दर्जा देऊन किमान दोन मार्गिकांचा रस्ता केला जाणार आहे. त्या अनुषंगाने उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा करून प्रस्तावित कामे मार्गी लावण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

संगमेश्वर ते गणपतीपुळे हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर पनवेल-महाड-पणजी राष्ट्रीय महामार्गावरून मुंबईच्या दिशेकडून येणाऱ्या पर्यटकांना गणपतीपुळेला जाण्यासाठी जवळचा पडेल. मुंबईवरून गणपतीपुळे येथे जाणारे पर्यटक सध्या महामार्गावरून निवळी मार्गे जातात. या मार्गाने संगमेश्वरपासून निवळीमार्गे गणपतीपुळे या अंतरापेक्षा व प्रस्तावित रस्त्यावरून संगमेश्वरपासून पोचरी फुणगुस डिंगणी जाकादेवी मार्गे गणपतीपुळे हेच अंतर ४0 किलोमीटरने कमी आहे. हा रस्ता श्री क्षेत्र गणपतीपुळे तिर्थक्षेत्र विकास आराखडा २०१७-१८ या योजनेतंर्गत मंजूर आहे. रस्त्याच्या कामासाठी ६ कोटी ९ लाख रुपये मंजूर आहेत. सध्या हा रस्ता ३.७५ मीटर रुंद असून तो 15 मीटर रुंद केला जाणार आहे.
 

संगमेश्वर ते जाकादेवी दरम्यान ४ रस्त्यांचा समावेश आहे. त्यामध्ये आरवली माखजन डिंगणी संगमेश्वर ( प्रमुख जिल्हा मार्ग, दहा किलोमीटर), पोचरी फुणगुस डिंगणी (इतर जिल्हा मार्ग), विल्ये पोचरी उक्षी वांद्री (प्रमुख जिल्हा मार्ग), अंजनवेल रानवी पालपेने राई भातगाव साखळी ते तरवळ.
पर्यटनाच्या दृष्टीने तसेच श्री क्षेत्र गणपतीपुळेस जाणाऱ्या भक्तजणांसाठी हा मार्ग रुंद केल्यास ते मोठे उपयुक्त ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.