नियम बदलले, सावकार अडकले

वसुली रखडली; अनेक व्यावसायिक अडचणीत

रत्नागिरी:- जिल्ह्यावर सावकारी पाश कायम असला तरी कोरोनामुळे सावकारच अडचणीत आहेत. कोरोनामुळे आर्थिक संकटात असलेल्या कर्जदारांनी हमी म्हणून दिलेले चेक बाऊन्स होत आहेत. त्यामुळे सावकारांना कर्जवसुली डोकेदुखी ठरत आहे. जिल्ह्यात सावकारांच्या माध्यमातून सुमारे 4 कोटी 2 लाखाच्या घरात उलाढाल होते. 68 नोंदणीकृत सावकारांकडून 1 हजार 104 कर्जदारांनी कर्ज घेतले आहे.

विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्रातील भागात सावकारीचे मोठे लोण आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही त्याचे प्रमाण वाढत आहे. दिवसेंदिवस हे लोण पसरत असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून मिळालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. जिल्ह्यात 1 हजार 104 जणांनी वर्षभरात कर्ज घेतल्याचे नोंदणीकृत सावकारांच्या माहितीतून पुढे आले आहे. या कर्जाचा आकडा सुमारे 4 कोटी 2 लाखाच्यावर आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात सावकारीतून आर्थिक उलाढाल होते. बँका किंवा अन्य संस्थांकडून कर्ज घेताना कागदपत्रांची जुळवाजुळव करताना नाकीनऊ येते. त्यामुळे सावकारांकडून कर्ज घेतले जाते. लॉकडाउनच्या काळात सर्वांवर आर्थिक संकट कोसळले आहे. अनेकांनी कर्जाची हमी म्हणून काही वस्तू तारण ठेवल्या आहेत तर काहींनी कोरे चेक दिले आहेत. परंतु अनेकांचे चेक बँकेत भरूनही ते बाऊन्स होत आहेत. त्यामुळे सावकारी व्यवसाय लॉकडाउनच्या काळात मोठ्या अडचणीत आले आहेत. काही कर्जदारांविरुद्ध सावकर कोर्टातही गेल्याचे समजते.

तारण कर्जाचे प्रमाण अधिक
सावकारीविरोधात कायद्याचेही संरक्षण आहे. परंतु, लोकांमध्ये जनजागृती नसल्याने सावकार कायद्याला बगल देत पिळवणूक करीत असल्याचे बोलले जाते. पुरावे दिल्यास कारवाईचे अधिकारही जिल्हा उपनिबंधकांना आहेत. जिल्ह्यात अधिकृत सावकारांची संख्या 68 आहे. बेकायदेशीर सावकारही आहेत. एखादा कागद किंवा शब्दाच्या विश्‍वासावर हा व्यवहार चालतो. मात्र ज्याची वसुलीची क्षमता आहे तोच या फंदात पडून गब्बर झाल्याची उदाहरणे आहेत. बिगर शेती कर्ज, तारण कर्जाचे प्रमाण अधिक आहे.