लॉकडाऊनचा फटका; आरटीओच्या महसुलात मोठी घसरण 

रत्नागिरीः– कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात  आले आहे. याचा परिणाम उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कर वसुलीवर झाला आहे. वार्षिक  ७७ कोटी ५१ लाखाचे उद्दीष्ट असताना सहा महिन्यात केवळ २० कोटी ८२ लाखांचा महसुल गोळा झाला आहे. त्यामुळे उर्वरीत सहा महिन्यात उद्दिष्ट पुर्ण करण्याचे आव्हान आरटीओ कार्यालयासमोर राहणार आहे.

नवीन वाहने खरेदी, जुन्या वाहनांचे कर, परवाने, शासनाचे विविध कर यामाध्यमातून आरटीओ कार्यालयात करोडो रुपयांचा महसुल गोळा होता. सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी आरटीओ कार्यालयाला ७७ कोटी ५१ लाखांचे उद्दीष्ट देण्यात आले होते. परंतु नवे आर्थिक वर्ष सुरु होतानाच लॉकडाऊन झाल्याने त्याचा परिणाम आरटीओ कार्यालयाच्या महसुलावर झाला आहे. एप्रिल ते जून या कालावधीत नवे वाहन खरेदी प्रक्रिया पुर्णतः बंद होती. तर कर भरण्याला मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे आरटीओ कार्यालयात कर जमा करण्यासाठी येणार्या वाहन चालकांची संख्या रोडावली होती.

सहा महिन्यांच्या कालावधीत विविध शुल्कांच्या आधारे तीन कोटी ७२ लाख ६८ हजार ६२८ जमा झाले. २३ हजार ७४३ थेट कार्यालयात तर ऑनलाईनच्या माध्यमातून ३२ लाख ७५ हजार ६५५ पर्यावरण कर जमा  झाला आहे. रोड सेफटी कर, नव्या वाहन खरेदीचा कर असे २० कोटी ८२ लाख ३४ हजार ८२५ रुपयाचा कर आरटीओ कार्यालयात जमा झाला आहे. सहा महिन्याच्या कालावधीत किमान ५० कोटीच्या आसपास कर जमा होणे अपेक्षित होते. परंतु लॉकडाऊनचा थेट परिणाम कर वसुलीवर झाला आहे.

गेल्या सहा महिन्यात असलेल्या लॉकडाऊनमुळे वाहनांवरील कारवाईची प्रक्रिया काही प्रमाणात थंडावली होती. तरीहि नियमाचा भंग करणाऱ्या १०५ वाहन चालकांना १४ लाख ५ हजार २१२ चा दंड करण्यात आला असून त्यातिल ७४ केसेस निकाली काढण्यात आल्या आहेत. अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर आता कारवाईची मोहिम आता पुन्हा हाती घेतली जाणार आहे.