अथर्व कंपनीकडून रत्नागिरीकरांना करोडोंचा चुना 

रत्नागिरी:- रत्नागिरीत कार्यालया असलेल्या अथर्व फोरयू इन्फ्रा अँड ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून गुंतवणूकदारांची सुमारे ९०० कोटींची फसवणूक करण्यात आली आहे. मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने तिघांना दहिसरमधून ताब्यात घेतले आहे. मात्र गेले दोन वर्ष कंपनीचे रत्नागिरीतील कार्यालय बंद आहे. रत्नागिरीतील गुंतवणूकदारांचे 28 कोटी या कंपनीत अडकल्याची माहिती समोर आली आहे.

सुमारे पाच वर्षांपुर्वी रत्नागिरी रेल्वेस्टेशन परिसरात या कंपनीचे शाखा कार्यालय उघडण्यात आले होते. कंपनीकडून गुंतवणूकदारांना दुप्पट व तिप्पट रकमेच्या परताव्याचे आमिष दाखवण्यात आले होते. व्यवसाय वाढवण्यासाठी अथर्व कंपनीकडून विविध स्तरावर एजंट्स नेमून गुंतवणूकदारांना विविध प्रलोभने दाखवली जात असत याला बळी पडत रत्नागिरी जिह्यामधून या कंपनीमध्ये कोटयावधी रूपयांची गुंतवणूक करण्यात आली. मात्र गुंतवणूकदारांचा परतावा देणे अशक्य होऊ लागताच कंपनीच्या अधिकार्यांनी जिल्ह्यातून पोबारा केला होता. महाराष्ट्रासह अनेक राज्यात या कंपनीच्या शाखा होत्या फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गुंतवणूकदारांनी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात सुरुवात केली त्यानुसार मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तपास सुरु करण्यात आला होता. दि. २२ ऑक्टोबर रोजी दहिसर परिसरातून या कंपनीचे अधिकारी सुरदास पाटील (४८) सुखदेव म्हात्रे (४१) व सुभाष नाईक (४०) यांना अटक करण्यात आली होती फसवणुकीची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी यापूर्वीच कंपनीचे संचालक शिवाजी नेफाडे, गणेश हजारे, सचिन गोसावी, मुकेश सुदेश यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली होती.
रत्नागिरीत गुंतवणूकरदारांना आकर्षित करण्यासाठी देण्यासाठी कंपनी शैक्षणिक, आरोग्य, शेळीपालन, आर्युवेदीक प्रसाधने, औषधे आदी प्रकारांमध्ये गुंतवणूक करत असल्याचे सांगत असे सुरुवातीला गुंतवणूकदारांचा विश्वास मिळवण्यासाठी तशाप्रकारे गुंतवणूकही केली होती मात्र आपले हीत साध्य होताच कंपनीकडून गाशा गुंडाळण्यात आला. अथर्व कंपनीची मालमत्ता जप्त करण्यात येत असून यामध्ये रत्नागिरीमधील मालमत्तेचाही समावेश आहे त्या दृष्टीनी पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. मात्र रत्नागिरीतल ठेविदारांनी स्थानिक आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केलेली नाही.