साठवण टाकी जागा असताना देखील नवी जागा खरेदीचा घाट

मिलिंद किर यांचा आरोप; 4 कोटी 27 लाखांचा भुर्दंड बसणार 

रत्नागिरीः- विस्तारीत नळपाणी योजनेमध्ये साठवण टाकीसाठी जागा उपलब्ध असतानाहि रत्नागिरी नगरपालिकेमार्फत आलिमवाडी येथे नवी जागा खरेदी करण्याचा ठराव पालिकेने केला आहे. त्यामुळे रत्नागिरीकरांवर ४ कोटी २७ लाखांचा आर्थिक भुर्दंड बसणार आहे. त्यामुळे आलिमवाडी जागा खरेदीसंदर्भात पालिकेने केलेले सर्व ठराव महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम ३०८ अन्वये रद्द करण्यात यावे अशी मागणी माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. यावर जिल्हाधिकारी कोणता निर्णय घेतात याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.

जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात श्री.मिलिंद कीर यांनी दावा दाखल करताना त्यामध्ये जागा खरेदीचा ठराव रद्द करण्याची मागणी प्रमुख्याने केली आहे. नगरपालिकेच्या विस्तारीत नळपाणी योजनेमध्ये शहरातील ३० टक्के भाग असलेल्या परटवणे,आलिमवाडी, मुरुगवाडा, पांढरा समुद्र,खालचीआळी, मांडवी ८० फुटी हायवे याभागातील नागरिकांवर पालिकेतील सर्व नगरसेवक, नगराध्यक्षांनी अन्याय केला आहे.
पाणी योजनेतील मंजुर साठवण टाकीहि मिरकरवाडा खडकमोहल्ला येथे पाच लाख लिटर क्षमतेची मंजुर आहे. तर पंधरामाड येथे २.४० लाख लिटर क्षमतेची साठवण टाकी प्रस्तावित आहे. त्यासाठी लागणारी जमीन उपलब्ध होत नसल्याचे पालिकेने म्हटले आहे. परंतु नगर परिषदेने सरकारी जागेचा प्रस्ताव दिला असता खडकमोहल्ला येथे ४ गुंठे जागा देण्याचे आपल्या कार्यालयाकडून मान्य करण्यात आले आहे असे असताना साठवण टाकीच्या जागेसाठी सुमारे १ कोटी २७ लाख ३२ हजार ५५१ केवळ ३.८८ गुंठे जागेसाठी खर्च करण्याचा घाट  घालण्यात आला आहे. 

जागा खरेदीसाठी स्थानिक नगरसेवकांकडून दबाव टाकला जात आहे. चढ्या दराने जागा खरेदी केल्यास पालिकेचे नुकसान होणार आहे. तर पाईपलाईनसाठी अतिरीक्त ३ कोटींचा खर्च होणार आहे. तर पाईपलाईन मंजुरी साठी २ वर्षाचा कालावधी लागेल. त्यामुळे विस्तारीत नळपाणी योजनेचे काम पुर्ण होण्यास विलंब होणार आहे. त्यामुळे संबंधित ठराव ३०८ खाली रद्द करण्यात यावे अशी मागणी श्री.किर यांनी केली आहे.