मत्स्य विभागाच्या ताफ्यात अत्याधुनिक गस्ती नौका

रत्नागिरी:- परराज्यातील नौकांसह अनधिकृत मासेमारीवर अंकुश ठेवण्यासाठीची गस्ती नौका रत्नागिरी मत्स्य विभागाला बुधवारी (ता. 4) मिळणार आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे सहाय्यक मत्स्य आयुक्त एन. व्ही. भादुले यांनी दिली.

जिल्ह्याच्या किनार्‍यावर पापलेट, म्हाकुळ, सरंगा, घोळीसारखी मासळी मिळत असल्यामुळे परराज्यातील नौकांनी गेले काही दिवस घुसखोरी सुरु आहे. रत्नागिरी, गुहागरपासून खोल समुद्रात शेकडो मलपी नौका जाळी मारुन मासळी नेत आहेत. अत्याधुनिक बनावटीच्या नौका असल्यामुळे स्थानिक मच्छीमार त्यांच्या आजूबाजूलाही फिरकत नाही. प्रशासनाकडून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मच्छीमारांकडून मागणी आहे; परंतु मत्स्य विभागाला अजुनही भाड्याने गस्ती नौकाच मिळालेली नव्हती. या गस्ती नौकेची निविदा प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली असून लवकर त्यांच्याविरोधात कारवाई सुरु होणार आहे.

गस्ती नौका नसल्यामुळे मत्स्य विभागाकडून बंदरावर उभे राहून गस्त घालावी लागते. त्याचा फायदा काही स्थानिक विना परवाना नौकांना होत आहे. दिवसभर बंदरावर ठाण मांडून असलेल्या अधिकार्‍यांना चकवा देत विनापरवाना मासेमारी करणो रात्रीच्या सुमारास बंदरात दाखल होता. रात्री उशिरा आल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करता येत नाही. मच्छीमारांकडून पाठशिवणीचा खेळ सुरु असल्यामुळे मत्स्य विभागही त्यांच्यापुढे हतबल झाला आहे. गस्ती नौका आल्यामुळे परराज्यातील नौकांसह विनापरवाना मासेमारी करणार्‍यांवर कारवाई करणे शक्य होणार आहे.