मेर्वीत एक संकट टळले तर दुसरे आले…

बिबट्याकडून पुन्हा गायीवर हल्ला 

रत्नागिरी:- तालुक्यातील मेर्वी येथे गुरुवारी सकाळी बिबट्या जेरबंद झाला झाल्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत असतानाच दुपारी बारा ते दोनच्या दरम्यान खर्डेवाडी येथील मारुती आत्माराम खर्डे यांच्या पाडीवर बिबट्याने हल्ला करून जखमी केले. परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

सकाळी पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद झाल्यानंतर ग्रामस्थांनी त्याला बघण्यासाठी गर्दी केली होती. बिबट्या सापडल्याने सुटकेचा निश्वास सोडला होता. हा आनंद व्यक्त करत असतानाच दुपारी मारुती खर्डे यांनी आपली गाय व वासरू नेहमीप्रमाणे जवळच असलेल्या जंगलात सोडले होते. दुपारी चारच्या सुमारास नेहमीप्रमाणे गाय वासरू आणण्यासाठी गेले असता वासरावर मोठी जखम झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तातडीने त्याला घरी आणले. परंतु तिची माता म्हणजेच गाय सायंकाळपर्यंत परिसरात कुठेही आढळून आली नव्हती. त्यामुळे पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण बनले आहे.

अजूनही या परिसरात बिबट्याचे वास्तव्य आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याने पुन्हा एकदा ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली वावरत असल्याचे चित्र दिसत आहे.