मिऱ्या येथे 22 एकर जागेत उभे राहणार प्राणी संग्रहालय

ना. सामंत; पर्यटन वाढीसाठी पाऊल 

रत्नागिरी:- मिऱ्या येथील २२ एकर जागेवर प्राणी संग्रहालय उभारण्यात येणार असून पर्यटनवाढीसाठी ग्लोबल इंडिया व्हिलेजच्या धर्तीवर प्रकल्प उभारण्यासाठी डॉ. सारंग कुलकर्णी यांची समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, प्राणी संग्रहालय आणि स्नेक पार्कसाठी आरे-वारे येथे जागेची निवड केली होती. तिथे सीआरझेडची अडचण असून कांदळवनाचा भाग आहे. त्यामुळे मिऱ्या येथे प्राणी संग्रहालय केले जाणार आहे. हे प्राणी संग्रालय पुणे, औरंगाबाद, जयपूर येथील प्राणी संग्रालयांशी संलग्न राहावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

विविध प्रकारचे प्राणी रत्नागिरीत आणणे शक्‍य होईल. यामुळे पर्यटनवाढीला चालना मिळणार आहे. तसेच जिल्ह्यात मेरीटाईम युनिर्व्हसिटी उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मिऱ्या येथील किनाऱ्यावर स्कुबा डायव्हिंगप्रमाणे समुद्राखालील जग पाहण्यासाठी पूरक असा ग्लोबल इंडिया व्हिलेजच्या धर्तीवर प्रकल्प उभारण्यासाठी चर्चा सुरू आहे. त्यासाठी सारंग कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर लागणारा निधी याची तरतूद केली जाईल.

रत्नागिरीतील अभियांत्रिकी महाविद्यालयाचा परिसर सुशोभित करण्यासाठी २५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. तर कंपन्यांना काळ्या यादीत टाकू विद्यापिठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेतील गोंधळाबाबत अभाविप संघटनेकडून केलेल्या आंदोलनावर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री सामंत म्हणाले की, कोरोना कालावधीत ऑनलाइन परीक्षा होऊ नये अशी मागणी होती; परंतु ती परीक्षा घ्यावी लागली.

ऑनलाइन पद्धतीने प्रथमच राज्यात होत आहे. काही विद्यापीठांकडून परीक्षा घेण्यासाठी कंपन्यांची नेमणूक केली होती. ज्या विद्यापीठांमध्ये अडचणी आल्या आहेत, त्याची चौकशीसाठी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची सत्यशोधन समिती स्थापन केली आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर संबंधित कंपन्या दोषी आढळल्यास काळ्या यादीत टाकले जाईल.