नियमबाह्य वागणाऱ्या पोलीस पाटीलावर चौकशी करुन कारवाईची मागणी

पर्शुराम अनंत घाडी यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

रत्नागिरी:- वहिवाटीबाबत प्रतिज्ञापत्र मागणी करुनही सोलगाव (ता. राजापूर) पोलीस पाटील धमक्या देवून हाकलून लावत आहेत. त्यांच्यामुळे प्रचंड आर्थिक व मानसिक नुकसान होत आहे. या परिस्थितीत संबंधित पोलीस पाटीलांची चौकशी करुन कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी पर्शुराम अनंत घाडी यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

सोलगाव (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथील काही ठराविक क्षेत्रात गेली 70 ते 80 वर्षापूर्वी पासून म्हणजेच पूर्वजांपासून कुळ हक्काने भातशेती, वरी, नाचणी, नागलीची पिके घेत आहोत. मोबदल्याच्या स्वरुपात मुळ जमीन मालक कै. श्रीधर हरी लेले यांना मिळेल त्या उत्पन्नातून भाताचे व पैशाचे स्वरुपात खंड घालत होतो. जमीन मालक कै. श्रीधर हरी लेले यांच्याशी घरोब्याचे संबंध असल्यामुळे खंडाच्या पावत्या देण्या-घेण्याचा प्रश्न उद्भवला नाही. याबाबत गावचे पोलीस पाटील रमेश सिताराम गावडे यांना पूर्वीपासून माहिती आहे. त्यामुळे ती कुळवहिवाट व कसवणुकीबाबतचा पोलीस पाटील श्री. गावडे यांच्याकडे दाखला व प्रतिज्ञापत्र याची वारंवार मागणी केली होती. पोलीस पाटील गावडे यांनी 25 सप्टेंबर 2020 ला आमच्याकडे त्या वहिवाटीबाबत मागणीपत्र द्या, मग तुम्हाला दाखला देतो असे सांगितले. त्याच दिवशी पोलीस पाटील गावडे यांना सहिचे मागणी पत्र दिले होते. असे असताही मागणी पत्र दिल्यावर पोलीस पाटील श्री. गावडे यांच्याकडे दाखला व प्रतिज्ञापत्र मागितला. त्यांनी आम्हाला धमक्या देवून अरेरावीची भाषा करुन तुम्ही सारखे – सारखे माझ्याकडे का येता, आता तुम्ही परत आलात तर तुम्हांला पोलीसांच्या ताब्यात देवू असे सांगितले. त्यावेळी आमच्याबरोबर वाडीतील रविकांत जयराम घाडी, तुकाराम पर्शुराम घाडी, जयवंत कृष्णा घाडी उपस्थित होते. पोलीस पाटील रमेश गावडे हे कायम दृष्ट बुध्दीने व आकसाने वागत आहेत. आमच्या मिळकतींबाबत स्वत: आणि गावातील इतर लोकांमार्फत दलाली करुन सध्याचे जमीन मालक मनोहर विठ्ठल घाडी, भास्कर विठ्ठल घाडी, रामचंद्र तानाजी घाडी यांच्याशी संगनमत करुन कमिशन बेसवर देवेंद्र शर्मा व इतर खरेदीदार यांना बेकायदेशीररित्या आमची फसवणूक करुन आम्हाला अंधारात ठेवून विक्री करत आहेत. पोलीस पाटील गावडे हे वारंवार आमच्या वहिवाटीबाबत प्रतिज्ञापत्र मागणी करुनही धमक्या देवून हाकलून लावत आहेत. त्यामुळे आमचे प्रचंड आर्थिक, शारिरिक व मानसिक नुकसान होत आहे. या परिस्थितीत पोलीस पाटील रमेश गावडे यांच्याबाबतच्या वरील सर्व तक्रारींचा विचार करुन तातडीने त्यांच्याविरोधात चौकशी करुन कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.