एक कोटीच्या ठेवी जमा
रत्नागिरी:- कुसुमताई सहकारी पतसंस्थेतर्फे दसरा-दिवाळी ठेव योजना जाहीर करण्यात आली आहे. 17 ऑक्टोबर ते 17 नोव्हेंबर या कालावधीसाठी ही ठेव योजना राहणार आहे. पहिल्या आठ दिवसात ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एक कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत, अशी माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष नाना शिंदे आणि उपाध्यक्ष सतीश शेवडे यांनी दिली.
कुसुमताई पतसंस्थेच्या जाकादेवी, पावस, खेडशी आणि गुहागर तालुक्यातील शृंगारतळी या शाखांमध्ये या योजनेंतर्गत ठेव स्वीकारली जाणार आहे. दसरा-दिवाळी योजनेंतर्गत 1 वर्षासाठी 8 टक्के व्याजदर, 3 वर्षासाठी (मासिक/त्रैमासिक) 7.25 टक्के, तीन वर्षे पुनर्गुंतवणुकीसाठी 7 टक्के व्याजदर ठेवण्यात आला आहे. आरडीसाठी (आवर्त) 1 वर्षाला 9 टक्के व्याजदर आहेत. त्याचबरोबर सोनेतारण कर्ज सुविधाही उपलब्ध आहेत. दसरा-दिवाळी ठेव योजना सुुरू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. एक कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या असून योजना संपुष्टात येईपर्यंत मोठी भर पडेल.
कुसुमताई पतसंस्थेतर्फे जुलै, ऑगस्ट महिन्यात सुरू केलेल्या ठेववृद्धी मास योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. कोरोना कालावधी असूनही तीन कोटीच्या ठेवी अनेकांनी पतसंस्थेत ठेवल्या होत्या. सध्या पतसंस्थेकडे 22 कोटींच्या ठेवी असून 18 कोटींचे कर्ज वितरण झाले आहे. 4 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. पुनर्गुंतवणूक 8 कोटींची आहे. पतसंस्थेने कोरोना कालावधीत विविध सामाजिक उपक्रम राबवत बांधिलकीही जपली आहे. त्यामुळे खातेदार आणि ठेवीदार पतसंस्थेतवर विश्वास ठेवतात, असे शेवडे यांनी सांगितले.