नौके अभावी मत्स्य विभागाची गस्त तोकडी

परराज्यातील नौकांचे अतिक्रमण; घुसखोरी थांबवण्याचे आव्हान 

रत्नागिरी:- मच्छिमारी हंगाम सुरु होऊन तिन महिने झाले तरीही मत्स्य विभागाकडे गस्ती नौकाच उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या हद्दीत अतिक्रमण करत मासेमारी करणार्‍या परराज्यातील नौकांना मोकळे रान मिळाले आहे. भाडे तत्त्वावर रत्नागिरीसाठी नौका घेण्याची निविदा प्रक्रिया सुरु असल्याचे मत्स्य विभागाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्याच्या किनार्‍यावर पापलेट, म्हाकुळ, सरंगा, घोळीसारखी मासळी मिळत असल्यामुळे परराज्यातील नौकांनी गेले काही दिवस घुसखोरी सुरु केली आहे. रत्नागिरी, गुहागरपासून खोल समुद्रात शेकडो मलपी नौका जाळी मारुन मासळी नेत असल्याचे प्रकार स्थानिक मच्छीमारांच्या निदर्शनास येत आहे. अत्याधुनिक बनावटीच्या नौका असल्यामुळे स्थानिक मच्छीमार त्यांच्या आजूबाजूलाही फिरकत नाही. प्रशासनाकडून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मच्छीमारांकडून मागणी होत आहे; परंतु मत्स्य विभागाला अजुनही भाड्याने गस्ती नौकाच मिळालेली नाही. स्वतःची गस्ती नौका नसल्यामुळे दरवर्षी निविदा प्रक्रिया राबवून नौका घ्यावी लागते. 1 ऑगस्टला हंगाम सुरु होता. ऑक्टोबर महिना संपत आला तरीही मत्स्य विभागाकडे नौका उपलब्ध नसल्याने कारवाई कशी करायची असा प्रश्‍नच आहे. 10 ते 12 वावाच्या मध्ये परराज्यातील नौकांचा धुमाकुळ सुरु असतो. सध्या मत्स्य विभागाकडून बंदरावर उभे राहून गस्त घालावी लागत आहे. यामध्येही विना परवाना मासेमारीसाठी जाणार्‍यांचा फायदा होत आहे. गेल्या पाच दिवसात काही कोटींची मासळी परप्रांतीयांनी नेली आहे. याचा फटका स्थानिक मच्छिमारांना बसणार आहे. वादळामुळे वारंवार मच्छीमारी बंद ठेवावी लागत आहे. त्यात परप्रांतीयांचे अतिक्रमणाची भर पडत आहे. गतवर्षी जिल्ह्याच्या मत्स्य उत्पादनात सुमारे सहा हजार टनानी घट झाली होती. भविष्यात त्यांच्यावर रोख लागला नाही, तर स्थानिक मच्छीमारांवर अन्यायच होणार आहे.

दरम्यान, गस्ती नौका भाड्याने घेण्यासाठी निविदा काढली होती. येत्या दोन दिवसात नौका रत्नागिरीत गस्तीसाठी सज्ज होईल असे मत्स्य विभागाकडून सांगण्यात आले. 200 हॉर्सपॉवरची नौका भाड्याने घेण्यात येणार आहे.