1 लाख 56 हजार वीज ग्राहकांकडे 76 कोटींची थकबाकी

रत्नागिरी:- कोरोना महामारीने महावितरणला थकबाकीचे ग्रहण लागले आहे. 4 महिन्यांच्या एकत्रित बिलांच्या आकड्याने वीज ग्राहक गरगरले. अनेकांनी वीज भरण्यास नकार दिल्याने थकबाकीने उच्चांक गाठला. जिल्ह्यात सप्टेंबरपर्यंत 1 लाख 56 हजार 27 ग्राहकांकडून 76 कोटी 71 लाख थकबाकी आहे. थकीत ग्राहकांना फोन करा, भेटून या, अशी गांधीगिरी करण्याचे वरिष्ठांचे आदेश आहेत. मात्र ऑक्टोबरनंतर अ‍ॅक्शन सुरू होणार आहे.  

महावितरणचे जिल्ह्यात 5 लाख 77 हजार 529 वीज ग्राहक आहेत. अजूनही दीड लाख ग्राहकांची थकबाकी आहे. त्यात ‘निसर्ग’ चक्रीवादळाने मंडणगड, दापोली, रत्नागिरी तालुक्यात महावितरणच्या विद्युत खांब, मुख्य वाहिन्या, डीपी आदींचे सुमारे 30 कोटींच्यावर नुकसान झाले आहे. लॉकडाउनमुळे ग्राहकांना तीन ते चार महिने वीज बिल देण्यात आले नव्हते.अनलॉकला सुरवात झाली आणि महावितरणने एकदम चार महिन्यांची एकत्रित बिले ग्राहकांना दिली. भरमसाठ आणि अव्वाच्या सव्वा बिलं आल्याच्या तक्रारी करत ग्राहकांनी त्याला विरोध केला. ग्राहकांना भरमसाठ बिले भरणेही शक्य नव्हते.महावितरण कंपनीने वसुली सक्तीची न करता ग्राहकांना टप्प्याटप्प्याने बिल भरण्याची सवलत दिली. त्यानुसार काही ग्राहक भरत असले तरी अनेकांची थकबाकी आहे. ग्राहकांना फोन करून समजावून सांगा, मोठ्या थकबाकीदारांना भेटी देऊन गांधीगिरी मार्गाने समजूत काढून बिले भरण्यास प्रवृत्त करा, असे आदेश आहेत. मात्र ऑक्टोबरनंतर थकबाकी वसुलीसाठी अ‍ॅक्शन घेणे भाग पडणार आहे. महिन्याला साधारण 30 ते 35 कोटीपर्यंत महावितरणची वसुली होते.