स्वउत्पन्न वाढीसाठी जि. प. तील सत्ताधाऱ्यांची पाऊले 

गाळे आणि जागा भाड्याने देण्याचा निर्णय 

रत्नागिरी:- कोरोना संकटात निधीची चणचण असताना स्वउत्पन्न वाढीच्यादृष्टीने जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी पाऊले उचलली आहेत. जिल्हा परिषद मालकीचे गाळे, जागा भाडे तत्त्वावर देऊन त्यातून उत्पन्न कसे मिळेल याकडे लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय अध्यक्ष रोहन बने यांनी शुक्रवारी बैठकीत सर्वानुमते घेतला. 

कोरोनामुळे शासनाकडून येणार्‍या निधीत घट झाली आहे. जिल्हा परिषदेचा कारभार चालवण्याची कसरत करावी लागत आहे. प्राप्त निधीतून आवश्यक विकास कामे करण्यावर भर दिला जात आहे. समतोल साधण्यासाठी गेले दोन महिने अध्यक्ष रोहन बने यांनी पदाधिकारी, सदस्य, प्रशासन यांच्यात सुसूत्रता आणली आहे. निधी आणण्यासाठी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. त्यानंतर शुक्रवारी (ता. 23) उत्पन्न वाढीसाठी बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी अर्थ व शिक्षण सभापती सुनिल मोरे, महिला व बाल कल्याण सभापती रजनी चिंगळे, समाजकल्याण सभापती ॠतुजा जाधव, आरोग्य व बांधकाम सभापती बाबू म्हाप, ज्येष्ठ सदस्य उदय बने, रचना महाडिक यांच्यासह विविध खात्याचे प्रमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदू जाखड उपस्थित होत्या.

मुंबई-गोवा महामार्गाजवळ जिल्हा परिषद मालकीच्या जागा आहेत. त्या विकसित करुन किंवा त्याठिकाणी जाहीरातीचे होर्डिंग लावण्याची व्यवस्था करण्यावर चर्चा झाली. होर्डींगच्या माध्यमातून उत्पन्न मिळू शकते असे पदाधिकार्‍यांनी सुचवले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीच्या जागांवर 174 गावांमध्ये गाळे बांधण्यात आले आहे. ते गाळे बचत गटांनी बनवलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी उपलब्ध करुन द्यावयाचे होते. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक गाळे बंद पडले. ते पुन्हा सुरु करुन महिला बचत गटांना भाडे तत्त्वावर दिले तर कायमस्वरुपी उत्पन्न सुरु होऊ शकते. त्यातील ग्रामंपंचायतीची जागा असलेल्या गाळ्यांचे भाडे त्यांना मिळेल. दोन्ही संस्थांंचे उत्पन्न सुरु होईल असे अध्यक्ष बने यांनी सांगितले.