काळबादेवी समुद्रकिनारी दुर्मिळ ‘स्टारफिश’चे दर्शन 

रत्नागिरी:- शहराजवळील काळबादेवी समुद्र किनारी दुर्मिळ स्टारफिश माशा आढळू लागला आहे. हा मासा सापडणे म्हणजे तेथील किनारा प्रदुषणविरहीत असल्याचा निर्वाळाच असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. थंडीच्या मोसमात स्टारफिश प्रजननासाठी उथळ, खडकाळ आणि शिंपले सापडत असलेल्या किनारी दाखल होतात. काळबादेवी किनारी दरवर्षी ऑक्टोबरनंतर हे स्टारफिशचे दर्शन होते असे येथील स्थानिक मच्छिमार आणि ग्रामस्थांचे मत आहे. याला मत्स्य संशोधकांनीही दुजोरा दिला.
 

मागील काही दिवस काळबादेवी किनारी स्टारफिश मासा सापडत आहेत. सोशल मिडियावरही त्याचे फोटो व्हायरल होत आहेत. हा मासा सापडणे म्हणजे तो किनारा प्रदुषणविरहीतच असल्याचे संशोधकांचे मत आहे.याबाबत मत्स्य संशोधक डॉ. स्वप्नजा मोहीते यांनी सांगितले की स्टारफिश हा आपल्या नलिका पादांचा उपयोग करून समुद्रातील खडक किंवा प्रवाळांवर सरपटत असतो. या माशाच्या खालच्या बाजूला असलेल्या तोंडाने ते खडकावर वाढणार्‍या सूक्ष्म जीव, शैवाल किंवा मृत प्राण्यांच्या शरीरावर उपजीविका करतात. व्हेल किंवा इतर मोठे प्राणी मृत झाल्यावर ते खाण्यासाठी स्टारफिश थव्याने तेथे पोहोचतात असे अभ्यासात आढळून आले आहे. हिवाळ्यात प्रजननासाठी ही ते थव्याने गोळा होतात. स्टारफिश उथळ पाण्यात सापडणार्‍या शिपल्यांसाठी किनारी भागात येतात. वादळी परिस्थितीमुळे लाटा उसळल्याने हा मासा किनार्‍यावर फेकला जातो किंवा मासेमारी करताना ते जाळ्यातही अडकण्याची शक्यता असते. या माशापासून कोणताही धोका होत नाही. हे मासे वाळूमध्ये रुतून राहतात.

प्रदुषणमुक्त म्हणून ओळखल्या जाणार्‍या किनार्‍यांमध्ये काळबादेवी, आरे-वारेचे नाव आहे. या किनारी फिल्टर फीडिंग म्हणजे गाळून खाद्य घेणार्‍या शिंपलावर्गीय मुळ्ये, काकई, कालवं यासारख्या जलचरांचा आढळ असतो. हे शिंपले प्रदूषण नसलेल्या ठिकाणीच वास्तव्य करतात. या दोन्ही किनार्‍यावर शिंपलावर्गीय मासळी सापडते. येथील कपारीमध्ये ते असतात. शिंपलावर्गीय प्राण्यांना खाण्यासाठी वेगळं तोंड नसते. पाण्याबरोबर येणारे अन्नाचे कण हे प्राणी खाद्यान्न म्हणून वापरतात. यामध्ये सर्वाधिक सुक्ष्म जीवांचा समावेश आहे. या दोन्ही किनार्‍या व्यतिरिक्त कर्ला, भाट्ये, जुवे किनार्‍यांवरही आहेत. पावसाळा संपल्यानंतर थंडी सुरु होण्याच्या तोंडावर स्टार फिश माशाचा प्रजनन काळ सुरु होतो. त्यावेळी हे मासे किनारी भागाकडे झुंडीने वळतात. त्याचबरोबर खाद्यासाठीही ते इकडे येत असल्याचे सांगितले जाते.

स्टार फिशच्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत. त्यातील काही कोकण किनार्‍यावर आढळतात. हा मासा मांसाहारी आणि शाकाहारी दोन्ही प्रकारचे अन्न खातो. त्या माशाला छोटे तोंड असते. त्यामुळे खाद्य खरवडून खातात. प्रवाळावरील उगवणारी छोटे प्राणी, प्लवंग, मृत मासे यावर त्यांची गुजराण होते.