सलग दुसऱ्या दिवशी रत्नागिरी तालुक्यात शून्य रुग्ण

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याच्या संख्येत हळूहळू घट होत आहे. मात्र सर्वात आनंदाची बातमी रत्नागिरी तालुकावासीयांसाठी आहे. सलग दुसऱ्या दिवशी रत्नागिरी तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण सापडून आलेला नाही. सर्वाधिक मृत्यू आणि सर्वाधिक रुग्ण सापडलेल्या रत्नागिरी तालुक्यासाठी ही विशेष बाब आहे. 

कोरोनासाठी रत्नागिरी तालुका सर्वाधिक हॉटस्पॉट ठरत होता. तालुक्यात सर्वाधिक बाधित रुग्ण आढळून आले होते. तर आता पर्यंत सर्वाधिक 82 मृत्यू देखील रत्नागिरी तालुक्यातच झाले आहेत. अशा परिस्थितीत मागील दिवसात आलेल्या अहवालाने तालुक्याला मोठा दिलासा मिळाला आहे.  
 

मागील काही दिवसांपासून रत्नागिरी तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण सापडण्याची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. अशातच गुरुवार पासून तालुक्याला दिलासा मिळण्यास सुरुवात झाली. गुरुवारी तालुक्यात फक्त एक पॉझिटिव्ह रुग्ण सापडून आला होता. मात्र शुक्रवारी आलेल्या अहवालाने तालुक्याला मोठा दिलासा मिळाला. सर्वाधिक रुग्ण सापडलेल्या रत्नागिरी तालुक्यात मागील चोवीस तासात एकही पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला नाही. तब्बल 48 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी देखील मोठा दिलासा मिळाला. शनिवारी रात्री आलेल्या अहवालानुसार रत्नागिरी तालुक्यात मागील चोवीस तासात एकही रुग्ण सापडलेला नाही.