रत्नागिरी:- आडिवरे (ता. राजापूर) येथील श्रीदेवी महाकालीच्या नवरात्रोत्सवावरही कोरोनामुळे यावर्षी बंधने आली आहेत. नवरात्रोत्सव काळात मंदिरांतर्गतच सर्व धार्मिक कार्यक्रम होणार असून, मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. यावर्षी देवीची पालखीही बाहेर न काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी सर्व मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. शासनाच्या या निर्णयाचे पालन करत श्रीदेवी महाकाली देवस्थानने यावर्षी मंदिरांतर्गत सर्व धार्मिक विधी करण्याचा निर्णय घेतला आहे. नवरात्रोत्सवानिमित्त रात्री मंदिरात आरती केली जाते. त्यानंतर देवीची पालखी प्रदक्षिणेसाठी बाहेर पडते. यावर्षी गर्दी टाळण्यासाठी पालखीसोबत मोजक्याच भाविकांनी उपस्थित राहण्याचा निर्णय घेण्यात आला हाेता.
मात्र, उत्सवाबाबत झालेल्या बैठकीत पालखीही बाहेर न काढण्याचा निर्णय घेण्यात आला. मंदिरात घट ठेवणे, त्याची पूजा करणे असे धार्मिक कार्यक्रमच करण्यात येणार आहेत. मंदिरातील प्रवचन, कीर्तन, गायन हे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. घट बसविण्याच्या दिवशी मंदिरात गुरव व खाेत मंडळीच मंदिरात उपस्थित राहणार आहेत. अन्य दिवशी केवळ गुरव मंडळीच पूजेसाठी मंदिरात राहणार आहेत.