जयगड बंदरात अद्यापही नौका ठाण मांडून

बंदर विभागाच्या सिग्नलची प्रतीक्षा

रत्नागिरी:- पावसाने उघडीप दिली असली तरी अजून खोल समुद्रातील वातावरण जैसे थे असल्यामुळे जयगड येथे आलेल्या परराज्यातील मच्छिमारी नौका दुसर्‍याही ठाण मांडून आहेत. बंदर विभागाकडून हिरवा कंदिल मिळाल्यानंतरच त्या रवाना होणार आहेत.

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मध्य महाराष्ट्राला पावसाचा तडाखा बसला. शुक्रवारी वातावरण निवळू लागले आहे. पण वेगवान वार्‍यांचा जोर आजही कायम होता. किनारी भागात त्याची तिव्रता अधिक होती. समुद्र खवळल्यामुळे गुजरात, केरळ, कर्नाटकसह मुंबई, हर्णैमधील सुमारे पाचशेहून अधिक नौका जयगड, लावगण येथील बंदरात आश्रयासाठी आलेल्या होत्या. दुसर्‍या दिवशी पावसाने विश्रांती घेतली; मात्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती खोल समुद्रात जैसे थे आहे. समुद्र खवळलेला असल्याने मच्छीमारी नौका अजुनही जयगड बंदरातच उभ्या आहेत. हवामान विभागाकडून 17 ऑक्टोबरपर्यंत पाऊस, वारा राहील असा इशारा दिला आहे. त्यामुळे समुद्र शांत झाला तर परराज्यातील त्या नौका रवाना होतील. बदलत्या वातावरणामुळे जिल्ह्यातील मासेमारी सलग तिसर्‍या दिवशी मासेमारी ठप्पच आहे. तीन दिवसात कोट्यवधीचे नुकसान मच्छीमारांना सोसावे लागले आहे.

आश्रयासाठी रत्नागिरीत येणार्‍या नौकांकडून जिल्ह्याच्या हद्दीत मोठ्याप्रमाणात मासळीची लूट होती. काही दिवसांपुर्वीच जयगड येथे आलेल्या शेकडो नौकांनी गणपतीपुळे येथे म्हाकुळ मारुन नेला. चारशेहून अधिक हॉर्सपॉवरच्या या नौकावर मासळी पकडण्याची अत्याधुनिक यंत्रणा असते. त्यावेळी स्थानिक मच्छिमारांच्या हाती 25 ते 50 किलो म्हाकुळ लागत असताना त्या नौकांनी पाचपट मासळी मारली होती. पुढे आठ दिवस नौकांना मासळी मिळाली नव्हती. यावेळीही तोच कित्ता गिरवला जाण्याची शक्यता आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पावले उचलण्याची शक्यता आहे.