मिऱ्यावरील ते जहाज भंगारात काढण्याची प्रक्रिया कासवगतीने

रत्नागिरी:- मिर्‍या किनारी अडकलेल्या बसरा स्टार जहाजाचे साडेचार महिन्यात प्रचंड नुकसान झाले आहे. दुरूस्तीला मोठा खर्च असल्याने ते भंगारात काढण्याचे निश्‍चित झाले आहे. मात्र परतीच्या पावसामुळे गेली काही दिवस वातावरण प्रतिकुल आहे. सरकारच्या डीजी शिपिंग कंपनीकडुनही जहाज भंगारात काढण्याबाबतची प्रक्रिया धिम्या गतिने सुरू आहे. त्यामुळे जहाज भंगारात काढण्याबाबतही दिरंगाई होताना दिसत आहे.

निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात भरकटलेले जहाज साडे चार महिने मिर्‍या किनार्‍यावर आहे. चक्रीवादळ आणि पावसाळ्यातील अनेक हायटाईड भरतीच्या लाटांचा तडाखा या जहाजाने सोसला आहे. त्यामुळे पाण्यावर तरंगणारे हे जहाज बंधार्‍यावर आदळुन फुटले आहे. बराचसा भाग काही ठिकाणी चेपला आहे. इंजिनसह जहाजावरील यंत्रणा, वस्तूंची वाताहात झाली आहे. जहाजामध्ये पाणी जाऊन ते किनार्‍यावर वाळुत रुतले आहे. जहाज वाचविण्याच्या दृष्टीने जोरदार हालचाली सुरू होत्या. भारत सरकारच्या डीजी शिपिंग कंपनीचे तांत्रिक अधिकारी (टेक्निशियन), जहाजाचे कॅप्टन, कर्मचारी आदींच्या साह्याने जहाजावरील ऑइल आणि डिझेल काढुन ते सुरक्षित केले. जहाजाबाबत एजन्सीने लवकरात लावकर निर्णय घ्यावा, यासाठी प्रादेशिक बंदर विभागाने नोटिसही बजावली आहे.

इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून हे जहाज काढण्याबाबत सर्व्हे झाला. या सर्व्हेमध्ये जहाजाचे प्रचंड नुकसान झाल्याचे पुढे आले. दुरूस्तीला काही कोटीत खर्च आहे. त्यापेक्षे ता जहाज भंगारात काढण्याचा एजन्सीने निर्णय घेतला. मात्र जहाज काढण्यासाठी अपेक्षित वातावरण नाही. पुन्हा परतीचा पाऊस, वादळ आदीमुळे अडचण निर्माण झाली आहे. तसेच डीजी शिपिंग कंपनीकडुनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने भंगारात काढण्याची प्रक्रिया खोळंबली आहे. त्यामुळे जहाजाचा मुक्काम आणखी वाढळा आहे.