रत्नागिरीत वादळी पाऊस; चांदेराई बाजारपेठेत पाणी भरण्यास सुरुवात 

रत्नागिरी:- वादळी वाऱ्यानी किनारपट्टीला दणका दिला. तर काजळी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने चांदेराई,  टेंभ्येपूल, सोमेश्‍वर, काजरघाटी या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून चांदेराई बाजारपेठेत पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. 

रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई पुलाला काजळी नदीच्या पुराचे पाणी लागले. पाणी वाढू लागल्याने बाजारपेठेतील व्यापारी सतर्क झाले आहेत. काजळी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने चांदेराईप्रमाणे, टेंभ्येपूल, सोमेश्‍वर, काजरघाटी आदी सखल भागात पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. पुराचे पाणी वाढल्यास शेकडो एकर भातशेती पाण्याखाली जाण्याची भीती आहे. गेल्या महिन्यात आलेल्या पुरामुळे भातशेती वाहून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. यंदा कोरोनामुळे चार महिने घरात बसलेल्या शेतकर्‍यांवर आता सलग दुसऱ्या पुराचे संकट ओढवले आहे.