क्यार, महा चक्रीवादळाचा मत्स्योत्पादनावर मोठा परिणाम; उत्पादन घटले

रत्नागिरी:- माशांच्या अन्नसाखळीतील बदल आणि गतवर्षी झालेल्या क्यार, महा चक्रीवादळाचा मत्स्योत्पादनावर परिणाम झाला आहे. बांगडा, तार्लीसह पापलेट, सुरमईसारखी सोनेरी मासळी रत्नागिरीच्या किनार्‍यावरुन हळूहळू कमी होऊ लागली आहे. 2019-20 या आर्थिक वर्षात जिल्ह्यात 66,173 मेट्रीक टन उत्पादन मिळाले. गतवर्षी 73 हजार 738 मेट्रीक टन उत्पादन मिळाले होते. तुलनेत साडेसात हजाराची घट असून बांगड्याचे उत्पादन 10 हजार मे. टनाने घटले.

जिल्ह्यात बुरोंडी, दाभोळ, मिरकरवाडा, हर्णै या प्रमुख बंदरांसह 21 ठिकाणी मासळी उतरवली जाते. गेल्या पाच वर्षात सातत्याने मत्स्योत्पादनात मोठी घट होत आहे. मत्स्यदुष्काळ जाहीर करावा अशी मागणी सातत्याने मच्छीमार करत आहेत. शासनाने पर्ससिनवर निर्बंध घातले तरही घट अजुनही वाढतच आहे. ऑगस्ट 2019 मध्ये हंगामाच्या सुरवातीलाच क्यार आणि महा या दोन चक्रीवादळांनी मासेमारी ठप्प होती. त्याचा उलाढालीवर परिणाम झाला. परराज्यातील नौकांचे अतिक्रमण उत्पादन घटीचे महत्त्वाचे कारण आहे. दरवर्षी कर्नाटक, केरळसह परजिल्ह्यातील अनेक मच्छिमारी नौका मासळीची लुट करतात. एलईडीद्वारे होणार्‍या मासेमारीचा गोंधळ अजुनही सुरुच आहे. यावर प्रतिबंध होत घालता येत नसल्यामुळे स्थानिक मच्छिमारांना भुर्दंड बसतो.

कोकण किनारपट्टीवरील अन्नसाखळीचे संतुलन बिघडल्यामुळेही उत्पादनात घट होत असल्याचे संशोधकांचे मत आहे. सुरमई, पापलेट, बळा, बोंबील, वाशी, स्कीड, कोळंबी या प्रमुख उत्पन्न देणारे मासे समुद्रातून कमी होत आहेत. ती घट सुमारे पाच हजार मे.टनाची आहे. राणीमाशाचे तीन हजार टनानी उत्पादन घटले. मच्छिमारांचे अर्थकारण अवलंबून असलेला बांगड्याचे गतवर्षी 16 हजार 752 मे.टन उत्पादन होते. यंदा त्यात दहा हजार मे.टनाची घट आहे. अवघा 6 हजार 127 मे.टन बांगडा जाळ्यात सापडला; मात्र गतवर्षीच्या तुलनेत तार्ली, कोळंबी, खवळी, म्हाकुळाचे उत्पादन शंभर टनाने वाढले आहे.