वादळाने रोखली मासेमारीची वाट 

रापण मच्छीमारांना रिपोर्ट चांगला; नौका मात्र बंदरात 

रत्नागिरी:- कोकण किनारपट्टीवर वाहत असलेल्या वेगवान वार्‍यांमुळे मच्छिमारीत अडथळे निर्माण झाला आहे. वार्‍यामुळे समुद्रात नौका हेलकावे घेत असल्याने गिलनेट, फिशिंगच्या अनेक बोटी बंदरातच उभ्या आहेत. पर्ससिननेट, ट्रॉलिंगसारख्या नौका समुद्रात रवाना झाल्या; मात्र मासळी किनार्‍याकडे वळल्याने रत्नागिरीत रापणीला दिवस चांगले आहेत. आठवड्यातून एकदा लाखोची करबंट (मिक्स मासळी) सापडत आहे.

हवामान विभागाकडून आलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यातील किनारी भागात वेगवान वारे वाहत आहे. ज्या मच्छिमारी नौका डोल नाही अशा फिशिंग, गिलनेटवाल्या नौका वार्‍याचा सामना करावा लागत आहे. अनेकांनी समुद्रात जाण्याचा धोका पत्करण्यापेक्षा बंदरात राहणे पसंत केले. त्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. पाऊस, वारा यामुळे मच्छीमारीत अडथळा असून पुढील तिन दिवस असेच वातावरण राहील असा अंदाज आहे. मच्छीमारांनाही सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. चार दिवसांपुर्वी म्हाकूळ, दोडी, पापलेट अशी मासळी बारा वावात मिळत होती. त्यावर पाणी फेरले गेले आहे. वातावरण बिघडले असले तरीही पर्ससिननेट, ट्रॉलिंगवाले मासेमारीसाठी रवाना होत आहेत. रविवारी (ता. 11) सायंकाळी समुद्रात गेलेल्या नौका परतल्या. पण सोमवारी काही नौका रवाना झाल्या आहेत. त्यांना रिपोर्ट लागलेला नाही. गेल्या महिन्याभरात रत्नागिरीतील रापणीने मासेमारी करणार्‍यांचा अच्छे दिन आले आहेत. रत्नागिरीत असलेल्या पाच रापणीना आठवड्यातून एकदा लाख रुपयांच्या मासळीची लॉटरी लागत आहे. रापणीला मासा मिळत असल्याने मच्छिमार समाधानी आहेत. लाखाच्या मासळीत दोडी, सौदाळा, बोंबील, पापलेट, म्हाकुळ, पातुर्डा, खवला, चिंगळं यासारखी मिक्स स्वरुपाची (करंबट) मासळी मिळत आहे.