पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत यांना पतीकडून भर बाजापेठेत मारहाण

रत्नागिरी:- घरगुती वादातून रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत यांना पती आणि दोन महिलांकडून भर बाजारपेठेत मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पती आणि त्या दोन महिलांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची ही घटना सोमवारी दुपारी 11.45 वा.सुमारास गोखले नाका येथील सलोनी लेडीज ब्युटीपार्लर बाहेर घडली.

सुकांत गजानन सावंत (रा.मिर्‍या बंदर,रत्नागिरी)  निधा (पुजा) स्वेतांग वायंगणकर आणि भक्ती शिंदे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात स्वप्नाली सुकांत सावंत (32,रा.सडामिर्‍या,रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, गोखले नाका येथील सलोनी ब्युटी पार्लरवरुन स्वप्नाली सावंत आणि त्यांचा पती सुकांत सावंत यांच्यात वाद सुरु आहेत. सोमवारी दुपारी स्वप्नाली सावंत पार्लरमध्ये असताना सुकांत सावंत, निधा वायंगणकर यांनी त्यांना पार्लरमधून बाहेर काढून त्यांच्या डाव्या हाताच्या करंगळीचा चावा घेतला. त्यानंतर निधा आणि भक्ती शिंदे या दोघींनी मिळून त्यांचे केस धरत हातांनी पाठीवर मारहाण करत मानेवर नखे लावली. तसेच गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला.
 

पती सुकांत सावंतनेही त्यांना हातांनी मारहाण करत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र घेत त्यांचे सामान फेकून दिले आणि गाडीची व रुमची चावी घेउन तिन्ही संशयित निघून गेले अशी तक्रार स्वप्नाली सावंत यांनी केली आहे. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात सुकांत सावंत, निधा वायंगणकर आणि भक्ती शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पाटील करत आहेत.