जप्त औषध साठ्याच्या चौकशीसाठी प्रांतांच्या अध्यक्षतेखाली समिती

रत्नागिरी:- कोल्हापूर येथून आलेले ते सलाईनचे 28 बॉक्स कुणी मागवले याची चौकशी करण्यासाठी प्रांताधिकारी विकास सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती स्थापन केली आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर चित्र स्पष्ट होईल असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

कोल्हापूर येथून आलेल्या औषधाचा साठा रत्नागिरीत जप्त करण्यात आला होता. तो कुणी पाठवला याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहे. खासगी कुरिअर सेवेतून आलेल्या ते बॉक्स जिल्हा शासकीय रुग्णालयातील कर्मचार्‍यांच्या नावे होता. या प्रकाराची कसुन चौकशी व्हावी असे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले होते. औषधाचा साठ्याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांना माहिती मिळाली होती. या प्रकाराची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी मिश्रा यांनी प्रांताधिताकारी डॉ. सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. त्यात सदस्य म्हणून जिल्हा परिषद  जिल्हा आरोग्य अधिकारी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त, लेखाधिकारी (जिल्हाधिकारी कर्यालय प्रशासन विभाग) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खासगी कुरिअरद्वारे ज्यांच्या नावे आला होता ते जिल्हा रुग्णालयातील आहेत. त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला आहे; परंतु त्यांनी तो साठा मागवलेला नाही असे कळविल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी सांगितले.
संबधित साठा घेवून येणार्‍या वाहतूकदारांची चौकशी

समितीच्या माध्यमातून केली जाणार आहे. जिल्हाधिकारी यांच्याबरोबर समितीची बैठक झाली की त्यातून खरे पुढे येईल अशी माहिती मंत्री सामंत यांनी दिली.