शिवसेना आमदाराकडून मंदिरातच शिवीगाळ, मारहाण 

चिपळूण:-   शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी तुरंबव येथे शिवीगाळ करतानाचा एक व्हिडीओ आज सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यानंतर आमदार जाधवांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे शिवसेनेच्या आमदारांना नक्की झालय तरी काय ? अशा प्रकारच्या संतप्त प्रतिक्रिया दिवसभर उमटत होत्या.
 

भास्कर जाधव यांचा मंदिरात एका ग्रामस्थाला शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तुरंबव येथील शारदा देवीचा नवरात्रोत्सव संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. येथे 9 दिवस यात्रा भरवली जाते. नवरात्रोत्सव साजरा करण्यासंदर्भात 6 ऑक्टोबरला बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मंदिर समितीच्या पदाधिकार्‍यांमध्ये रुपे लावण्यावरून वाद झाला. त्या वादावर तोडगा काढण्यासाठी काही सदस्यांनी भास्कर जाधव यांना बोलविले होते. भास्कर जाधव दोन्ही बाजूच्या लोकांची समजूत काढत असताना मंदिराच्या वरच्या मजल्यावरून व्हिडीओ शुटींग केले जात होते.

हा प्रकार भास्कर जाधव यांना समजल्यानंतर त्यांचा पारा चढला. त्यांनी शुटींग करणार्‍याला शिवीगाळ केली. या दरम्यान पोलिस मंदिरात दाखल झाले त्यामुळे प्रकरण शांत झाले होते. मात्र दोन दिवसानंतर हा भास्कर जाधवांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आज दिवसभर उलटसुलट चर्चा सुरू झाली. नक्की काय घडले हे जाणून घेण्यासाठी भास्कर जाधवांना राज्यभरातून फोन येत होते. स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात गर्दी केली होती. जाधव कार्यकर्त्यांना घडला प्रकार सांगून माघारी पाठवत होते.