‘माझे कुटुंब’च्या पर्यवेक्षणासाठी पालक अधिकारी

जिल्हा परिषद; जिल्ह्यात 1 लाख कोमॉर्बिड रुग्ण

रत्नागिरी:- माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहिमेच्या पर्यवेक्षणासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व खाते प्रमुखांची प्रत्येक 1 तालुक्याचे पालक अधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत या मोहिमेचा आढावा नियमितपणे घेण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यातील 87 टक्के काम पूर्ण झाले आहे. साडेतेरा लाख लोकांच्या तपासणीत 1 लाख 6 हजार नागरिक हे कोमॉर्बिड (अतिगंभीर आजार) असलेले आहेत.

कोविड नियंत्रणासाठी अधिक प्रभावी आरोग्य शिक्षण मोहिमेचे मुख्य उद्दीष्ट आहे. घरोघरी जाऊन लोकांची प्राणवायू व ताप याची तपासणी करणे, आरोग्य शिक्षणासह महत्वाचे आरोग्य संदेश देणे, कोरोना संशयित शोधणे, उपचारासाठी सेवा देणे याबाबी राबविल्या जात आहेत. मधुमेह ह्यदयविकार, मुत्रपिंड (किडनी) विकार यासारखे आजार असणार्‍या व्यक्तींना शोधुन काढणे व उपचारोसाठी संदर्भ सेवा देणे. कोविड नियंत्रणासाठी आवश्यक त्रिसुत्रीचा प्रचार केला जात आहे. नागरिकांनी आपापसात किमान दोन मीटरचे सुरक्षित अंतर ठेवणे, मास्कचा नियमितपणे व योग्य वापर करणे, वारंवार हात स्वच्छ धुणे या त्रिसुत्री प्रत्येकाने पाळणे गरजेचे आहे.
या मोहिमेत रत्नागिरी जिल्हयात 16 पथक कार्यरत आहेत. 3 लाख 85 हजार 202 घरांना भेटी देण्यात आल्या. यामध्ये केलेल्या सर्वेक्षणात 13 लाख 38 हजार 904 पैकी 255 सारीचे, 1893 सर्दी, तापाचे रुग्ण तर 1 लाख 6 हजार 786 कोमॉर्बिड आजाराने ग्रस्त रुग्ण आहेत. कोरोना तपासणीसाठी पाठवलेल्या 1,949 रुग्णांपैकी 254 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

मोहिमेच्या जनजागृतीसाठी पोस्टर्स, बॅनर्स आणि चित्ररथाद्वारे संदेश दिले गेले आहेत. टी-शर्ट व मास्क यांचे वाटप सुरु असून एसटी बसेस आणि इतर वाहनांना स्टिकर्स लावून प्रसिध्दी केली जात आहे. वक्तृत्व, गाणी, नाटिका, व्हिडिओ, निबंध, रांगोळी, छायाचित्रण आणि प्रश्नमंजूषा स्पर्धा जाहिर केल्या आहेत.