59 लाखाच्या दरोडाप्रकरणी मुंबईतून महिला ताब्यात; साडेबारा लाखाची रोकड जप्त

खेड:- दोन किलो सोने स्वस्त्यात देण्याचे आमिष दाखवून करण्यात आलेल्या 59 लाखाच्या लुटीतील आणखी साडेबारा लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात खेड पोलिसांना यश आले आहे. मुंबई अनटॉप हिल येथे राहणाऱ्या एका महिलेच्या घरातून ही रोकड हस्तगत करण्यात आली. दीपाली स्वप्नील मोहिते असे या महिलेचे नाव असून पोलिसांना तिला अटक केली आहे.

16 सप्टेंबर रोजी महामार्गावरील उधळे गावच्या हद्दीतील जगलात दोन किलो सोने स्वस्त्यात देण्याच्या आमिषाने तब्बल 59 लाख 6 हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आली होती. या दरोड्या प्रकरणी खेड पोलिस आणि गुन्हे अन्वेषण विभागच्या अधिकाऱ्यांनी मुख्य सुत्रधार किशोर पवारयाच्यासह 12 जणांना ताब्यात घेतले होते. ताब्यात घेतलेला आरोपींकडून पोलिसांनी दरोड्यातील 36 लाखाची रोकड रिकव्हर केली होती. तर उर्वरीत रोकड हस्तगत करण्यासाठी पोलीस प्रयत्नशील होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी किशोर पवार याची पोलिस कसून चौकशी करीत असताना लुटीच्या रकमेपैकी साडेबारा लाखाची रोकड त्याची बहिण दिपाली स्वप्नील मोहिते हिच्या मुंबईतील अॅनटॉपहील येथील घरी ठेवले असल्याचे निष्पण्ण झाले होते. 

किशोर पवार याच्याकडून ही माहिती मिळताच खेड पोलीस स्थानकाच्या पोलीस निरिक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलिसांनी तात्काळ मुंबईतील अॅनटॉपहील परिसरात सापळा रचला आणि किशोर याची बहिण दिपाली मोहिते हिला शिताफीने अटक केली. तिच्या घरातून साडेबारा लाखांची रोकड हस्तगत करण्यात आल्याने 59 लाखाचा लुटीतील 48 लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात पोलीस यशस्वी झाले आहेत. तिच्या अटकेमुळे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या तेरा झाली आहे