जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण घटले 

रत्नागिरी:- देशासह राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारनं ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम देखील हाती घेतली आहे. या मोहिमेतंर्गत आरोग्य सेविका घरोघरी जात प्रत्येकाची तपासणी करत आहेत. दरम्यान, कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये देखील कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं समोर आलं होतं.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोकणात गणेशोत्सव, शिमगासह सर्वच सण अत्यंत साधेपणानं साजरे केले गेले. पण, आता रत्नागिरी जिल्ह्यातून सर्वांना दिलासादायक अशी बातमी समोर येत आहे. कारण, सप्टेंबरच्या मध्यापर्यंत जिल्ह्यात रोज शंभर, दीडशे किंवा अगदी दोनशे रूग्ण देखील कोरोनाचे आढळून येत होते. पण, आता मात्र हिच संख्या कमी होताना दिसून येत असल्यानं जिल्ह्याला दिलासा मिळत आहे. एकंदरीत 22 ऑक्टोबरपासूनची आकडेवारी पाहिली असता 22 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात 63 रूग्ण आढळून आले. 23 सप्टेंबर रोजी 71, 24 सप्टेंबर रोजी 51, 25 सप्टेंबर रोजी 116, 26 सप्टेंबर रोजी 44, 27 सप्टेंबर रोजी 68, 28 सप्टेंबर रोजी 85, 29 सप्टेंबर रोजी 64, 30 सप्टेंबर रोजी 77, 1 ऑक्टोबर रोजी 91, 2 ऑक्टोबर रोजी 67, 4 ऑक्टोबर रोजी 38 रूग्ण आढळून आले. सध्याच्या घडीला जिल्ह्यात कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या ही 86.06 टक्के इतकी झाली आहे. जिल्ह्यात 4 ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात एकूण 7669 कोरोना रूग्ण होते. पैकी 6600 जणांनी कोरोनावर मात केली असून 273 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

कोरोनाचे रूग्ण आढळू लागल्यास त्याला रोखण्यासाठी गाव पातळीवर देखील काही निर्णय अद्याप देखील उत्फूर्तपणे घेतले जात आहेत. काही ठिकाणी बाजारपेठा बंद ठेवत काही काळ लॉकडाऊन केले जात आहे. केवळ कोरोनाला रोखणे हाच उद्देश असल्याचं मत यावेळी स्थानिक व्यक्त करतात. एकंदरीत सध्याची स्थिती पाहता कोरोना रूग्णांची संख्या कमी होत असली तरी नागरिक मात्र दिवसेंदिवस सतर्क होत असल्याचे दिसून येत आहे.