उमेदच्या कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

रत्नागिरी:-  महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती (उमेद) अभियांनातर्गत कंत्राटी अधिकारी, कर्मचारी यांच्या पुर्ननियुक्ती शासनाकडून थांबविण्यात आली आहे. त्याविरोधात सोमवारी उमेदच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन छेडले.

उमेद अभियानांतर्गत कंत्राटी स्वरूपात काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या पुर्ननियुक्ती थांबविण्याचे आदेश दिले आहेत. राज्यभरात 3000 हून अधिक अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 135 पदे मंजूर असून त्यापैकी 84 पदे भरलेली आहेत. इतक्या कमी मनुष्यबळात काम करत असताना जिल्ह्यातील 6 पदांवरील अधिकारी, कर्मचारी यांना कार्यमुक्त करण्यात आलेले आहे. भविष्यात जिल्ह्यातील इतरांना कार्यमुक्त केले जाईल.
 

उमेद अंतर्गत ग्रामीण भागातील गरीबातील गरीब कुटुंबाना स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून संघटीत करण्याचे काम सुरु आहे. या अभियानात कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवा काही काळात खंडीत होणार आहेत. ज्या संस्था या अधिकारी-कर्मचारी यांनी अहोरात्र मेहनत घेऊन विविधांगी समस्यांना सामोरे जाऊन अथक प्रयत्नातून उभारल्या आहेत. या स्थितीत वार्‍यावर सोडून त्याच अधिकारी-कर्मचारी यांना अचानक घरचा रस्ता दाखविणे, हे जितके संबंधित कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांच्या अन्यायकारक आहे. याबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उमेदच्या सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय धरणे छेडले. उमेद अभियानातील पदभरती कायम ठेवणे, पुर्ननियुक्ती किंवा पदभरती बाह्य यंत्रणेकडून करण्यात येवू नये, 58 वयापर्यंत रोजगाराची हमी मिळावी, सर्व कंत्राटी कर्मचा-यांना सामाजिक सुरक्षा योजना लागू करावीत, मागणी व सोईनुसार बदली मिळावी अशा मागण्या शासनाकडे करण्यात आल्या आहेत. याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले.