‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अंतर्गत जिल्ह्यातील 9 लाख 69 हजार जणांचे सर्वेक्षण

रत्नागिरी:- महाराष्ट्र शासनाच्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या उपक्रमांतर्गत स्थापन केलेल्या 564 आरोग्य पथकांच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 9 लाख 69 हजार जणांचे सर्वेक्षण पूर्ण झाले. यामध्ये अतिगंभीर आजार असलेले (कोमॉर्बिड) 76 हजार 684 रुग्ण असून त्यांची काळजी घेण्याचे आव्हान आरोग्य विभागापुढे आहे. कोरोनाशी निगडीत लक्षणे असलेल्या 598 जणांच्या अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या असून त्यात 143 पॉझिटिव्ह तर 169 सारीचे रुग्ण सापडले.

राज्यासह जिल्ह्यात सध्या कोरोनाची संख्या वाढत आहे.जिल्ह्यात तर कोरोनाने कहरच सुरू आहे. रुग्णांनी 6 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर या महामारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम राज्यभरात राबवली जात आहे. शहर, गाव, वस्त्या, तांडे यातील प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी, अतितीव्र स्वरुपाचे आजार असल्यास त्यांना उपचार देणे, प्रत्येक नागरिकास व्यक्तीशः भेटून आरोग्य शिक्षण देणे या गोष्टी करण्यात येत आहे. या मोहिमेला 15 सप्टेंबरपासून सुरूवात झाली असून, 25 ऑक्टोबरपर्यंत ही मोहीम चालणार आहे.

प्रत्येक घरातील सर्व सदस्यांना ताप, खोकला, दम लागणे आदी कोवीड सदृश्य लक्षणे आहेत का? याची तपासणी करणे, अत्यावश्यक वाटल्यास कोव्हिड चाचणी करून पुढील उपचारासाठी पाठवण्यात येत आहे. जिल्ह्यात 4 लाख 40 हजार 572 घरातील 15 लाख 42 हजार 612 लोकांची तपासणी करण्याचे लक्ष्य आहे. तपासणीसाठी 1,602 गावात 686 पथके असून 2,026 कर्मचारी नियुक्त केले आहेत. 15 सप्टेंबरनंतर आतापर्यंत 62.77 टक्के सर्वेक्षण झाले. त्यात 2 लाख 76 हजार 560 कुटुंबातील 9 लाख 69 हजार 299 लोकांची तपासणी केली. यामध्ये ‘सारी’ रोगाची लक्षणे असलेले 169 रुग्ण आढळले. त्यात शहरातील 57 तर ग्रामीण भागातील 112 रुग्ण आहेत. सर्दी, खोकला, ताप लक्षणे असलेले 1070 रुग्ण, कोमॉर्बिड म्हणजेच कोरोनासाठी अतिगंभीर ठरणारे (उदा. मधुमेह, हृदयरोग यासारखे) रुग्ण 76 हजार 684 आहेत. एकुण सर्व्हेक्षणातील 721 रुग्णांची कोरोना तपासणी केली. त्यातील 143 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

बाधितांमध्ये ग्रामीण भागातील 120 रुग्ण असून शहरातील रुग्ण 23 आहेत. चिपळूण, संगमेश्वर, खेड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळलेले आहेत. शहरी भागातही चिपळूण पालिका क्षेत्रातील बाधितांची संख्या अधिक आहे.