राजापूर:- महावितरणची ११ केव्ही क्षमतेची विद्युतभारीत वाहिनी ओढ्यात पडल्याने त्याचा शॉक लागून खेकडे पकडत असलेल्या पितापुत्राचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना तालुक्यातील नाणार गावी घडली .
शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडलेल्या या घटनेने नाणार गावासह पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे. शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास नाणारमधील ४२ वर्षीय ग्रामस्थ असलेले ग्रामपंचायतीतील शिपाई दिवाकर पूजारी हे आपला इयत्ता चौथीतील दहा वर्षीय मुलगा अथर्व याच्यासह गावातीलच ओढ्यावर खेकडे पकडण्यासाठी गेले होते . याच ओढ्यावरून महावितरणची ११ केव्हीची विद्युत वाहिनी गेलेली आहे. या वाहिनीच्या कंडक्टर तुटल्याने विद्युतभारित वाहिनी ओढ्यात कोसळली.
याच दरम्यान हे दोघे पितापुत्र खेकडे पकडण्यासाठी ओढ्यात उतरले होते. त्यांना जबर शॉक बसून त्यांचा मृत्यू ओढवला. या दुर्घटनेनंतर महावितरणचे अधिकारी अपघातस्थळी पोहोचले होते. रात्री उशीरापर्यंत घटनेची माहिती घेण्याचे व पंचानामा करण्याचे काम सुरू होते. तहसीलदार प्रतिभा वराळे यांना दुर्घटनेची माहिती मिळताच त्यांनी महसूल व महावितरण प्रशासनाला सहकार्याच्या सूचना केल्या.