तुतारीचा आवाज कमी,एर्नाकुलम गरजली

कोकण रेल्वे ; वेगवान गाड्यांकडे प्रवाशांना कल

रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावर चार विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत; मात्र कोविडचा परिणाम या गाड्यांवर दिसत आहे. गेल्या पाच दिवसात तुतारी एक्स्प्रेसमधून 30 ते 45 टक्केच प्रवासी प्रवास करत आहेत. मोठी प्रवासी क्षमता असलेल्या या गाडीला कमी प्रतिसाद मिळत असल्याने मोठा आर्थिक भुर्दंड कोरेला बसणार आहे. तुलनेत निजामुद्दीन एर्नाकुलम नेत्रावती एक्स्प्रेसला क्षमतेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळत आहे.

कोकण आणि मुंबईचे नाते आगळेवेगळे आहे. नोकरी, व्यवसायानिमित्त लाखो कोकणी मुंबईत वास्तव्य करत आहेत. कोरोनामुळे ही मंडळी गावाकडे परतली आहेत. कोरोनाचे सावट कमी होऊ लागल्यानंतर काहींनी पुन्हा मुंबई गाठली आहे; परंतु अनेकजण वाहतूक व्यवस्था नसल्याने गावाकडेच राहिले आहेत. एसटीपाठोपाठ कोकण रेल्वेनेही विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला. सध्या कोकण रेल्वे मार्गावर लोकमान्य टिळक ते तिरुवअनंतपुरम (06345/46), एर्नाकुलम एक्स्प्रेस (02618/17), दादर-सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस (01003/04), बेंगळुरू सिटी (06585/86) या चार गाड्या धावत आहेत. यामध्येही एका दिवसात जाऊन येण्यासाठी वेगवान गाड्यांची प्रवाशांना अधिक गरज आहे. कोकणातील लोकांच्या मागणीनुसार दादर-सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस विशेष गाडी 26 पासून सुरू करण्यात आली; मात्र गेल्या पाच दिवसात त्याला कमी प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दिवशी मुंबईहून 33 टक्के तर परतीच्या प्रवासात 59 टक्के तिकिटे आरक्षण आहे. लोकमान्य टिळक एक्स्प्रेसला 24 सप्टेंबरपासून सरासरी 70 टक्के तिकिटांचे आरक्षण होते. कारवार एक्स्प्रेसला अत्यंत कमी प्रतिसाद असून सरासरी 15 ते 17 टक्के प्रवाशांनी तिकीटे आरक्षित केली होत. तुलनेत एर्नाकुलम नेत्रावती एक्स्प्रेसला सर्वाधिक प्रतिसाद मिळत आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांनी तिकिटे आरक्षित केली होती.

तुतारीला कमी प्रतिसाद कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या तुतारी एक्स्प्रेसला पुढील चार दिवसातील आरक्षणातही कमी प्रतिसाद आहे. लोकमान्य टिळक-तिरुवअनंतपुरम गाडीला 45 टक्केच, तर तुतारीला 47 टक्के प्रतिसाद मिळत आहे. कारवार एक्स्प्रेसला अत्यंत कमी प्रतिसाद आहे. एर्नाकुलम नेत्रावती एक्स्प्रेसला मुंबईहून येणार्‍यांकडून 112 टक्के तर परतीसाठी 75 टक्केपर्यंत आरक्षण आहे.