लॉकडाऊचा फटका बंदर विभागाला देखील; महसुलात मोठी घट

रत्नागिरी:- कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका बंदर विभागाला बसला आहे. जहाजांवरील मालातून मिळणारा बंदर विभागाचा महसूल कोरोना काळात सुमारे 60 टक्क्याने घटला आहे. कोरोना काळातील मागील सहा महिन्यात अवघा 60 लाख रूपयांचा महसूल मिळाला आहे.

लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी वर्षभरात 3 कोटी 25 लाख रूपयांचा महसूल मिळाला होता.रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोठ्या बंदरांचा गटनिहाय समावेश झालेला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील काही बंदरे वेंगुर्ले गटात गेली आहेत. रत्नागिरी गटामध्ये 9 बंदरे येतात. यामध्ये रत्नागिरीतील फिनोलेक्स, अल्ट्राटेक, वरवडे, जयगड, दाभोळ, बोर्‍या, पालशेत, हर्णै, केळशी, बाणकोट या बंदरांचा समावेश असल्याचे बंदर निरीक्षक शंकर महानवर यांनी सांगितले. रत्नागिरीतीलच पूर्णगड आणि जैतापूर ही बंदरे वेंगुर्ले गटात गेली आहेत.

बंदरांवर कार्गो जहाजातून येणारा माल किंवा या जहाजांतून पाठवल्या जाणार्‍या मालाचे शुल्क म्हणजेच माल चढणावळ आणि उतरणावळ शुल्क, बंदर करातून शासनाला महसूल मिळतो. याचे शासकीय दर निश्चित आहेत. पाईपसाठी लागणारा कच्चा माल (व्हीएलएम), कोळसा, इथिलीन आदी वस्तूंची या बंदरांमधून वाहतूक होते. काही वर्षांपूर्वी गॅसही येत होता. परंतु, स्थानिकांच्या विरोधामुळे जहाजातून गॅस येणे बंद झाले आहे.

बंदर विभागाला 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 या एक वर्षाच्या कालावधीत 3 कोटी 25 लाख रूपयांचा महसूल मिळाला. सन 2018-19च्या कालावधीत 2 कोटी 86 लाख रूपयांचा महसूल मिळाला. त्यानंतर कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाले आणि या लॉकडाऊनच्या सहा महिन्यात केवळ 60 लाख रूपयांचा महसूल मिळाला असल्याची माहिती बंदर निरीक्षक महानवर यांनी दिली.