जिल्ह्यात 74 शाळांच्या समायोजनाची तयारी

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निर्णय, पालकदेखील सहमत 

रत्नागिरी:- एक आणि दोन पटाच्या शाळांमध्ये मुलांचा सर्वांगीण विकास होत नसल्यामुळे शासनाने त्या शाळांमधील मुलांचे समायोजन जवळच्या अन्य जिल्हा परिषद शाळेत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला जिल्ह्यातील सुमारे 74 शाळांच्या व्यवस्थापन समित्यांनी सहमती दर्शवली आहे. एक किलोमीटरच्या आत असलेल्या दुर्गम भाग नसलेल्या शाळांनी आपणहून हा निर्णय घेतल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

रत्नागिरी जिल्ह्यात 0 ते 5 पटांच्या 286 प्राथमिक आणि 27 उर्दू माध्यमाच्या शाळा आहेत. कमी पटाच्या शाळांमधील मुलांचे सामाजीकरण, शैक्षणिक व कौशल्य संपादन होऊ शकत नाही, विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व विकास होणार नाही, कमी पटांच्या शाळेत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण शैक्षणिक विकास होणार नाही. सभाधीटपणा, सहाध्यायी अध्ययन, विद्यार्थ्यांना सहशालेय उपक्रमांत सहभागी होता येणार नाही. त्या मुलांच्या अध्यापनावर परिणाम होतो. एकटी-दुकटे शिकणारे विद्यार्थी एकलकोंडे बनतात. त्यातून मानसिक विकासात अडथळा निर्माण होतो. कमी पटांच्या शाळांमध्ये पालक सहभाग, समाज सहभाग, शैक्षणिक उठाव यामध्येही अडचणी येतात. त्यामुळे आनंददायी शिक्षणात अडथळे निर्माण होतात. कमी पटांच्या शाळांमध्ये कला, क्रीडा, कार्यानुभव, हस्तकला आणि विविध गुणदर्शन कार्यक्रमांसाठी विद्यार्थ्यांना वाव मिळत नाही. विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेता येत नसल्यामुळे त्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत नाही. यासाठी समायोजनाचा पर्याय काढला गेला आहे.

शासनाच्या आदेशानंतर समायोजनाविषयी जिल्हा परिषद शिक्षण समितीत चर्चा झाली. अंतरामुळे विद्यार्थ्यांचे समायोजन करणे शक्य होत नसल्यास त्या विद्यार्थ्यांना वाहतूक अनुदान देण्याचा प्रस्तावही शासनाने उपलब्ध करून दिला आहे. शाळांची आवश्यकता तपासूनच हा निर्णय घेतला जावा, असे शिक्षण समितीत ठरवण्यात आले. समायोजनाविषयी शाळेवर दबाव आणू नये, अशा सूचना शिक्षण सभापती सुनील मोरे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार एक किलोमीटरच्या आतील आणि समायोजन करणे शक्य असलेल्या सुमारे 74 शाळा व्यवस्थापन समित्यांनी सकारात्मक निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी तत्काळ करण्यात येणार आहे.