निवडणूक आल्यानेच कोतवडेत विरोधकांचे राजकारण: उपसरपंच स्वप्नील मयेकर

रत्नागिरी:- तालुक्यातील कोतवडे-कोलगेवाडी येथे जागामालकाची परवानगी घेऊन, निविदा प्रक्रिया मागवून गणपती विसर्जन घाट बांधण्यात आला. 14 व्या वित्त आयोगांतर्गत ही निविदा प्रक्रिया राबवली. परंतु ग्रामपंचायतीला त्रास देण्याच्या दृष्टीने तक्रार करण्यात आली असावी. परंतु अन्य ग्रामस्थांची याबाबत कोणतीही तक्रार नाही. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फक्त राजकारण करण्यासाठी व सत्ताधार्‍यांना त्रास देण्यासाठी तक्रारी केल्या जात असाव्यात, असा खुलासा कोतवडे उपसरपंच स्वप्नील मयेकर यांनी निवेदनाद्वारे केला आहे.

18 सप्टेंबरला पंचायत समितीच्या सभेत कोतवडे-कोलगेवाडी येथील गणपती विसर्जन घाटाबाबत काही आक्षेप नोंदवण्यात आले होते. तसेच बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना धारेवर धरण्याचा प्रकार घडला. मात्र कोतवडे ग्रामपंचायतीला त्रास होण्यासाठी हे राजकारण केले जात असल्याचा आरोप श्री. मयेकर यांनी केला आहे. सध्या ग्रामपंचायतीचा कार्यकाल संपल्यामुळे प्रशासकाची नेमणूक झाली आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोधकांकडून आता फक्त राजकारण पेटवले जात असल्याचा आरोप स्वप्नील मयेकर यांनी केला.

यासंदर्भात स्वप्नील मयेकर यांनी सांगितले, विसर्जन घाट बांधण्यासाठी जागामालकांचे संमतीपत्र घेतले. त्यामुळे विनामोबदला कायमस्वरूपी जागा घाटासाठी मिळाली. 14 व्या वित्त आयोगातून घाट बांधण्यात आला. या घाटाची नोंद ग्रामपंचायत दफ्तरी करण्यात आली. 14 व्या वित्त आयोगाच्या विकासकामांच्या यादीत या कामाचाही समावेश होता.

विसर्जन घाटाविरोधात तक्रार अर्ज आला. त्याच्या चौकशीसाठी गटविकास अधिकार्‍यांच्या दालनात श्री. मयेकर यांनी जबाब दिला. त्यात म्हटले आहे की, 14 व्या वित्त आयोग निधीमधून कोलगेवाडी येथे गणपती विसर्जन घाट बांधण्याचे काम जाहीर निविदा मागवून पूर्ण केले आहे. या कामावर 45 हजार रुपये खर्च आला. रितसर निविदा मागवून काम मक्तेदारामार्फत पूर्ण केले आहे. त्याचे देयक मक्तेदाराला 10 सप्टेंबर 2018 रोजी चेकद्वारे अदा केले आहे. यामध्ये कोणताही अपहार झाला नाही. अर्जदार रोजगारानिमित्त बाहेरगावी असतात. हे काम 2018-19 मध्ये झाले असून तसा फलकही लावण्यात आला. ग्रामपंचायतीला त्रास देण्याच्या दृष्टीने ही तक्रार केली असावी. मात्र इतर ग्रामस्थांची याबाबत कोणतीही तक्रार नाही.