कोविड योद्धे चार महिने पगाराविना

जिल्ह्यातील 72 डॉक्टरांची व्यथा ; आरोग्य यंत्रणेकडून दुर्लक्ष

रत्नागिरी:- कोरोना योद्धा म्हणून जीव धोक्यात टाकून राष्ट्रीय आपत्तीला तोड देणारे डॉक्टरच सध्या वेगळ्याच समस्येला तोंड देत आहेत. 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने नेमलेले डॉक्टर कोविड योद्धा म्हणून लढत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने कोविड योद्धांना सुविधा, वेतन वेळेवर द्या, असे आदेश शासनाला दिले आहेत. मात्र जिल्ह्यातील 72 डॉक्टर आणि काही नर्सेस गेली 4 महिने पगाराविना आहेत. त्यामुळे या योद्धांची मानसिकता ढासळू लागली असून शासनाने दखल घेण्याची मागणी केली आहे.

जिल्ह्यात मोठ्या संख्येने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडत आहे. कोविड बाधित किंवा संशयितांना क्वारंटाईन सेंटर किंवा कोविड रुग्णालयात योग्य उपचार मिळावेत यासाठी मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. म्हणून शासनाने 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर वैद्यकीय अधिकार्‍यांची नियुक्ती केली आहे. जिल्ह्यात असे 72 वैद्यकीय अधिकारी कोविड योद्धा म्हणून जीवाची पर्वा न करता लढत आहेत. कोरोना योद्धांची मानसिकता चांगली राहण्यासाठी त्यांना सुविधा आणि पगार वेळच्या वेळी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र जिल्ह्यातील हे 72 कोरोना योद्धा गेली चार महिने पगाराविना आहेत. आतापर्यंत त्यांची कोणती तक्रार नव्हती. मात्र आता त्यांचेही आर्थिक बजेट कोलमडले असून मानसिकता ढासळू लागली आहे. कोरोनाची लागण होणार नाही, याची दक्षता घेऊन दबावाखाली डॉक्टर, काम करत आहेत. ड्युटी करून धोका पत्करणारे, कुटुंबापासून लाब राहणारे हे डॉक्टर आज गेली चार महिने पगाराविना आहेत.

याबाबत आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा केली. ते म्हणाले शासनाकडून कोविड अनुदान न आल्यामुळे डॉक्टरांचे पगार रखडले आहेत. त्यापैकी काहींचे झाले आहेत. अनुदान लवकर मिळण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत.

सेवेत तरी कामय करून घ्या

अकरा महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर नेमलेल्या या डॉक्टरांना चार महिने पगार नाहीच. त्यात 11 महिन्याने पुन्हा काय हा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहेच. त्यामुळे शासनाने या कोविड योद्धांना सेवेत कायम करून घ्यावे, अशी मागणीही होत आहे.