कोकण रेल्वे बनावटीची डेमू ट्रेन नेपाळला रवाना

दोन अत्याधुनिक डेमू ट्रेन नेपाळ रेल्वेकडे सुपूर्द

रत्नागिरी:- नेपाळ सरकारशी झालेल्या करारानुसार स्वदेशी बनावटीच्या दोन अत्याधुनिक डेमू ट्रेन कोकण रेल्वेने नेपाळच्या रेल्वेकडे नुकत्याच सुपूर्द केल्या आहेत.  या संदर्भातील करारावर मे 2019 मध्ये सह्या झाल्या होत्या. भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ प्रकल्पा अंतर्गत या गाड्या तयार करुन नेपाळला देण्यात आल्या. यामुळे कोकण रेल्वेच्या अभियांत्रिकी कौशल्याची झलक आता नेपाळवासीयांना अनुभवायाला मिळणार आहे. या गाड्या भारतातील जयनगर (बिहार) तसेच नेपाळमधील जनकपूर जिल्ह्यातील कुर्था स्थानकादरम्यान धावणार आहेत. 

दि. 10 मे 2019 रोज या संदर्भात नेपाळ रेल्वेशी कोकण रेल्वेचा करार झाला होता. त्यानुसार 1600 हॉर्स पॉवर क्षमतेच्या या  अत्याधुनिक डेमू ट्रेन चेन्नई येथील ‘इंटेग्रल कोच फॅक्टरी’मध्ये (आयसीएफ) तयार करण्यात आल्या. भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया – मेक फॉर वर्ल्ड’ या मिशन अंतर्गत हा प्रकल्प आहे.

रेल्वे प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या या  दोन डेमू ट्रेनमध्ये प्रत्येकी एक डिझेल पॉवर कार, एक डिझेल ट्रेलर कार तसेच तीन ट्रेलर कारचा समावेश आहे. यामध्ये एका वातानुकूलित कोचचा देखील समवेश आहे. कोकण रेल्वेकडून नेपाळला सोपविण्यात आलेल्या या दोन डेमू ट्रेन संपूर्ण भारतीय तंत्रज्ञान वापरुन बनविण्यात आल्या आहेत. या संदर्भात नेपाळ सरकारच्या रेल्वे मंत्रालयाशी 52.46 कोटी रुपयांचा करार झाला होता. दि. 18 सप्टेंबरला या गाड्या नेपाळकडे सोपवण्यात आल्या.