शाळा बंदला 70 टक्के समित्यांचा विरोध

अध्यक्ष, सभापतींकडून आढावा; सक्ती न करण्याचे आदेश

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या 0 ते 5 पटाच्या शाळा बंद करण्यास बहूतांश शाळा व्यवस्थापन समित्यांकडून विरोध दर्शविला जात आहे. त्यामुळे शाळा बंद करण्याच्या शासनाच्या निर्णयावर रत्नागिरीत सावधगिरीने अंमलबजावणी करावी लागणार आहे. त्यादृष्टीने अध्यक्ष रोहन बने, शिक्षण सभापती सुनील मोरेंनी शाळा बंद करण्यासाठी कोणावरही जबदरस्ती करु नये असे आदेश दिले आहेत.

अध्यक्ष बने यांनी शिक्षक संघटना प्रतिनिधींच्या उपस्थितीत शुक्रवारी (ता. 18) बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी उपाध्यक्ष महेश नाटेकर, शिक्षण सभापती मोरे यांच्यासह शिक्षणाधिकारी उपस्थित होत्या. शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील 313 शाळा बंद कमी पट असल्यामुळे बंद करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रत्येक तालुक्यातून शाळा व्यवस्थापन समितीची मते घेण्याचे काम सुरु आहे. याचा आढावा अध्यक्ष बने यांनी घेतला. बंद करण्यात येणार्‍या शाळेपासून समायोजन केल्या जाणार्‍या शाळेचे अंतर एक कीलोमीटरपेक्षा अधिक असल्यामुळे पालकांकडूनच विरोध दर्शवला जात आहे. 0 ते 5 पटाच्या एकुण शाळांपैकी 70 टक्के व्यवस्थापन समित्यांनी शाळा बदंला विरोध केला आहे. मंडणगड तालुक्यात चार शाळा शुन्य पटाच्या आहेत. त्या आपसूकच बंद होतील; परंतु उर्वरित कमी पटाच्या शाळा दुर्गम भाग असल्याने बंद करण्यास पालकांनी नाकारले आहे. तीच परिस्थिती राजापूर तालुक्याची आहे. तेथे पाच शाळा शुन्य पटाच्या आहेत. पालकांची मानसिकता नसल्याचे तालुक्यातील शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांकडून जिल्हास्तरावर कळवण्यात आले आहे.

दरम्यान, शाळा बंद केल्यास सुमारे चारशे शिक्षक अतिरिक्त ठरणार असून त्यांचे समायोजन जवळच्या किंवा रिक्त पदे असलेल्या शाळांमध्ये करावे लागणार आहे. त्यांचे समायोजन जिल्हास्तरावर झाले तर कदाचित त्या शिक्षकांना तालुक्याच्या बाहेर जावे लागण्याची शक्यता आहे. शिक्षक संघटनांकडूनही शाळा बंदला सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. एकुण परिस्थितीचा विचार घेऊनच अध्यक्ष आणि शिक्षण सभापती यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांना सुचना दिलेल्या आहेत.

शाळा बंद करण्यासाठी कोणावरही जबरदस्ती करु नये. ही प्रक्रिया करताना विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेतले जाईल. कोणत्याहीप्रकारे सक्ती केली जाणार नाही. – रोहन बने, अध्यक्ष, जिल्हा परिषद