पोलीस कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्यांना कात्री

15 टक्केच बदली निकषाचा 86 पोलिसांना फटका

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी आवडीच्या ठिकाणी जाण्यासाठी उत्सुक असलेल्या ८६ पोलीस कर्मचाऱ्यांच्या विनंत्या अमान्य केल्या आहेत. तर ६७ प्रशासकीय बदल्यासह १४ विनंत्या अशा ८१ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदापासून पोलीस शिपाई, चालक पदापर्यंतच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. विनंती बदल्या अमान्य झाल्याने काही कर्मचारी नाराज झाले असल्याची चर्चा पोलीस दलात सुरू आहे.

राज्यासह देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने एकूण पदांपैकी १५ टक्के कर्मचाऱ्यांच्या शासकीय बदल्या करण्याचे आदेश गृह विभागाने दिले होते. त्यानुसार पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. एकूण ६३ कर्मचाऱ्यांच्या शासकीय बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये ४  सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, १८ पोलीस हवालदार, १२ पोलीस नाईक, १४ पोलीस शिपाई, १५ वाहन चालक तर कसूरी रिपोर्ट असलेल्या चार कर्मचाऱ्यांच्या मुदतपूर्व बदल्या करण्यात आले आहेत. तर अकरा चालकांच्या विनंती अमान्य करण्यात आल्या आहेत.जिल्ह्यातील विविध पोलीस स्थानकात कार्यरत असलेल्या तब्बल ८६ पोलीस कर्मचाऱ्यांनी विनंती बदली करण्याची विनंती पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे यांच्याकडे केली होती. जिल्ह्याचा निरोप घेताना डॉ. मुंढे कर्मचाऱ्यांना आवडीच्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांची विनंती मान्य करतील अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांमध्ये होती. परंतु कोरोना प्रादुर्भावामुळे केवळ १५ टक्के  बदल्या करण्याचे आदेश शासनाने दिल्याने डॉ. मुंढे  यांनी  ८६ कर्मचाऱ्यांच्या विनंत्या फेटाळून लावल्या आहेत. केवळ १४ कर्मचाऱ्यांच्या विनंत्या मान्य करण्यात आल्या असून त्यानुसार त्यांची बदली करण्यात आली आहे.