गुहागर:- विदर्भ कोकण बँक मॅनजर खून प्रकरणी नवानगर गावातीलच दोन मारेकरी अटक करण्यात आले आहेत. अवघ्या काही तासात पोलिसांनी यशस्वी तपास करत बँक मॅनेजर खून प्रकरणात दोघांना बेड्या ठोकल्या असून लवकरच खुनाचे कारण देखील समोर येणार आहे.
गुहागर तालुक्यातील धोपावे व नवानगर धक्क्यादरम्यान एका महिलाचा मृतदेह तरंगत असल्याचे गुरुवारी सकाळी काही मच्छीमारांच्या निदर्शनास आले. सदर घटनेची खबर मिळताच पोलीस घटनास्थळी आले. दाभोळ खाडीत जमीनीवर उभे रहावे अशा पध्दतीने तरंगत असलेला मृतदेह पाहिल्यावर पोलीसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. गुरुवारी सर्वपित्री अमावास्या असल्याने दुपारी भरतीला जोर होता. त्यामुळे घटनास्थळी आलेल्या पोलीसांना मृतदेह काढण्यासाठी दोन तास धडपडावे लागले. संशयास्पद मृत्यु असल्याने अत्यंत सावधपणे हा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यावेळी सदर मृतदेहाच्या मांड्यांना दोरखंड बांधलेला होता. व दोरखंडाच्या दुसऱ्या टोकाला मोठा दगड बांधण्यात आला होता. त्यावरुन हा खून असल्याचे निश्चित झाले.
पोलीस यंत्रणा माहिती मिळाल्यापासूनच कामाला लागली होती. सुनेत्रा दुर्गोली यांच्या फोन नंबरमधील माहिती घेणे, फोन नंबरवरुन कोणाकोणाला कशाप्रकारे कॉल झाले याची माहिती घेणे, गुहागर चिपळूण दरम्यानच्या सीसटीव्ही फुटेज संकलीत करणे अशी. कामे सुरु केली.
दरम्यान या प्रकरणी रात्री उशिरा पोलिसांनी गावातील दोघांना ताब्यात घेतले आहे. यामुळे बँक मॅनेजर खून प्रकरण नेमके कोणत्या कारणातून घडले याचा उलगडा होणार आहे.