सकल मराठा समाजाच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन 

रत्नागिरी:- हक्काचे मराठा आरक्षण मिळविण्यासाठी सकल मराठा समाज पुन्हा एकवटला आहे. राज्यात मोठा लढा उभारण्याचा निर्धार समाजाने केला आहे. त्याअनुषंगाने उद्या (ता. 18) सकाळी दहा वाजता तालुक्यातील सकल मराठा समाज आंदोलन करणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर एकत्र येण्याचे आवाहन मराठी क्रांती मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी केले आहे.

मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज आणि समाजाच्या विविध संघटनांच्यावतीने एल्गार पुकारला आहे. रत्नागिरीत देखील मराठा समाजबांधव उद्या (ता. 18) आंदोलनाला सुरवात करणार आहे. याबाबत मराठा क्रांती मोर्चाचे रत्नागिरीचे समन्वयक सुधाकर सावंत म्हणाले की, मराठा आरक्षण हे आमच्या हक्काचे आहे. ते मिळविण्यासाठी सकल मराठा समाज पुन्हा एकवटला आहे. राज्यात आणि जिल्ह्यात गाव पातळीवर आंदोलनाची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

रत्नागिरी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून उद्या सकाळी 10 वाजता रत्नागिरी तालुक्यातील सर्व मराठा समाजबांधव रत्नागिरीत एकवटतील. आरक्षणासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांच्यामार्फत शासनाला निवेदन देण्यात येणार आहे. निवेदन देण्यासाठी समस्त मराठा बांधवांनी उद्या सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र यावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने करण्यात आले आहे. आंदोलन यशस्वी करण्यासाठी मराठा समाजाच्यावतीने दिनेश सावंत, सुधाकर सावंत, अ‍ॅड. अजय भोसले, संतोष तावडे, केशवराव इंदुलकर, कौस्तुभ सावंत, नंदू चव्हाण आदीसह अनेकजण परिश्रम घेत आहेत.