वाहतूक पोलीस नाही म्हणून नियम तोडताय, सावधान तिसरा डोळा तुमच्यावर लक्ष ठेवतोय…

रत्नागिरी:- चौकात पोलीस नसताना नियम तोडणाऱ्यांवर आता पोलीसांचा तिसरा डोळा नजर ठेवणार आहे. शहरातील मारुती मंदिर परिसरात नवीन सीसी टिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. या कॅमेऱ्यामुळे नियंत्रण कक्षातून कर्मचारी झूम इन करुन माळनाक्यापर्यंत वॉच ठेवणार आहे. अशा प्रकारचे कॅमेरे जिल्ह्यात प्रथमच  बसविण्यात आले आहेत. मंगळवारी पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या हस्ते नूतन यंत्रणेचा शुभारंभ करण्यात आला.

जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर लक्ष ठेवण्यासाठी यापूर्वीच मुख्य शहरे आणि महत्त्वाच्या ठिकाणांची पोलिसांनी पाहणी केली होती. त्यामध्ये जिल्ह्यात सुमारे ५६ ठिकाणे निश्चित केली होती. या ठिकाणांवर वॉच ठेवण्यासाठी सीसी टिव्ही बसविण्यात आले. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मात्र कालांतराने  या कॅमेेऱ्यांचा उपयोग नव्हता. पोलिसांना गुन्ह्याच्या वेळी अपेक्षित फायदा होत नव्हता.

शहरातील  बंद पडलेले अनेक कॅमेरे दुरूस्त करण्यात आले. त्यानंतर याचे कंट्रोल रुम बसविण्याचा जिल्हा पोलिसांचा मानस होता. त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज असल्याने हा विषय मागे पडला. मात्र गुन्हेगाराचा छडा लावण्यासाठी त्याचा फारसा फायदा होत नाही. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुढे यांच्या पुढाकाराने आणखी दोन दर्जेदार कॅमेरे बसविण्यात आले. मारुती मंदीर येथे २ लाखाचे २ सीसी टिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हे कॅमेरे पुर्ण गोलाकार फिरणार आहेत. लांबचा परिसर कव्हर करणारे असून त्यांना झुम इन आहे. त्यामुळे अगदी माळनाक्यापर्यंत काही घटना घडली तरी झुम करून चांगले फुटेज देण्याची क्षमता या कॅमेऱ्यात आहे. मंगळवारी पोलीस अधिक्षक डॉ.प्रविण मुंढे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वाहतूक पोलीस निरिक्षक अनिल विभूते,पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.