टीआरपीतले योगा क्लास भोवले; अनेकजण पॉझिटिव्ह सापडले

रत्नागिरी:- योगाच्या माध्यमातून कोरोना शिवणार देखील नाही असा दावा करणाऱ्या एका योग गुरूच्या योगा क्लास मधील अनेकजण पॉझिटिव्ह निघाल्याने खळबळ उडाली आहे. टीआरपी येथील घरात छुपके सुरू असलेल्या या योगा क्लास मधील अनेकजण पॉझिटिव्ह आले आहेत.

लॉकडाऊनच्या काळापासून शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून या योग गुरुचे क्लास सुरु असून कोरोना सारखी महाभयंकर साथ पसरवण्यास कारणीभूत ठरणाऱ्या या योगगुरुवर प्रशासनाने कारवाई केली पाहिजे असे देखील बोलले जात आहे. मात्र पोलिसांनी कारवाई केली तर मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन योगा करीन असे देखील या गुरुचे म्हणणे आहे.

आपल्या घराच्या टेरेसवर या योग गुरुचे क्लास अनेक महिने सुरु होते. ज्या टेरेसवर सुमारे ८ जण योगा करू शकतात त्या टेरेसवर २८ जणांच्या तीन तीन बॅच घेतल्या जात होत्या. आजवर शासनाने साथीचा फैलाव होऊ नये म्हणून शाळा, महविद्यालये, क्लास यांना परवानगी दिलेली नाही मात्र या नियमाचे उलंघन करून या योगगुरुचे क्लास सुरु होते असे आता बोलले जात आहेत. 

सध्या याच क्लास मध्ये कोरोनाने संक्रमित झालेले काहीजण रुग्णालयात उपचार घेत आहेत. ज्याने आजवर कोरोना होणारच नाही असा दावा केला होता तो देखील आता खोकू लागला असून आता त्याने शिष्यांच्या दबावामुळे ऑनलाईन क्लास सुरु केल्याची चर्चा आहे. एका सुप्रसिद्ध आयुर्वेदिक कंपनीची कोरोनावरील उत्पादने घ्या म्हणजे तुम्हाला कोरोना होणार नाही असा दावा देखील व्हाट्स अप ग्रुपवरून याने सुरु केला आहे.