जिल्ह्यात 168 पोलिसांना कोरोनाची लागण

33 जणांवर उपचार, 64 जण कोरोनामुक्त

रत्नागिरी:- जिल्ह्यामध्ये कोरोनाचा कहर वाढत असतानाच जिल्हा पोलीस दलामध्येही अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने कोरोनाबाधित झाले आहेत. जिल्ह्यात तब्बल 168 अधिकारी व कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली असून सध्या 33 कर्मचार्‍यांवर उपचार सुरु आहेत. 71 कर्मचार्‍यांना होमक्वॉरंटाईन करण्यात आले असून 64 कर्मचारी कोरोनामुक्त होऊन कर्तव्यावर रुजू झाले आहेत.

लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी बजावली. विशेषत: जिल्हाबंदीच्या कालावधीत जिल्ह्याच्या सीमा बंद करीत ई-पास असणार्‍यांनाच जिल्ह्यात प्रवेश दिला. जिल्ह्याच्या सिमेवर बंदोबस्तासाठी कार्यरत असणार्‍या काही कर्मचार्‍यांना यातूनच कोरोनाची लागण झाली. त्याचप्रमाणे कोवीड सेंटर, जिल्हा रुग्णालयात कामासाठी जाणारे कर्मचारीही कोरोनाच्या जाळ्यात आले.

दिवसरात्र रस्त्यावर बंदोबस्त करीत कोरोना वाढू नये याची काळजी घेणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांमध्येच कोरोनाने शिरकाव केला. अगदी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे हेही अपवाद ठरले नाहीत. कोरोनावर मात करीत त्यांनी कर्मचार्‍यांना एक प्रकारे कोरोनाविरोधात लढण्याची ताकद दिली. बरे होऊन आल्यानंतर डॉ. मुंढे यांनी पुढाकार घेत, पोलीस कर्मचारी, त्यांची कुटुंबिय, होमगार्ड यांच्यासाठी पोलीस मुख्यालय, चिपळूण उपविभागीय कार्यालय परिसरात विशेष कोरोना सेंटर सुरु केले. याचा फायदा अनेक कर्मचार्‍यांना झाला.

जिल्ह्यात 12 पोलीस अधिकार्‍यांना, 151 पोलीस कर्मचारी, 1 पोलीस मुख्यालयातील लिपिक व चार होमगार्ड अशा 168जणांना जिल्ह्यात कोरोनाची बाधा झाली.  यातील 64 अधिकारी व कर्मचारी कोरोनामुक्त होऊन कर्तव्यावर रुजूही झाले आहेत. तर 71 कर्मचारी व अधिकार्‍यांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.33 कर्मचारी व अधिकारी उद्याप कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.
जिल्ह्यात आतापर्यत 65 अधिकारी, 1064 कर्मचारी, 19 मंत्रालयीन कर्मचारी, वर्ग 4 चे 5 कर्मचारी, 10 सफाई कामगार तर 7 होमगार्डचे स्वॅब तपासण्यात आले आहेत.