अंशकालीन स्त्री परिचर मानधनापासून वंचित 

रत्नागिरी:–  कोरोना प्रतिबंधाच्या मोहिमेत आरोग्य विभागस्तरावर कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील अंशकालीन स्त्री परिचर जीवाची पर्वा न करता या कार्यात झोकून काम करत आहेत. मात्र गेल्या मार्च 2020 पासून जिल्ह्यातील 380 अशंकालीन स्त्री परिचरांना कोरोना मानधन तर जून ते ऑगस्टपासून नियमित मानधनापासून वंचित ठेवण्याचा प्रकार आरोग्य विभागस्तरावर घडला असल्याचे या संघटनेचे म्हणणे आहे.

कोरोनाच्या लढाईत जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य उपकेंद्रात स्त्री परिचर कार्यरत आहेत. आरोग्य सेविकांसोबत या अंशकालीन स्त्री परिचर कोरोना प्रतिबंधाच्या मोहिमेत ग्रामीण स्तरावर काम करत आहेत. पण त्यांना दिल्या जाणाऱ्या मानधनासाठी अजूनही आरोग्य विभागस्तरावरून कार्यवाही झालेली नसल्याचे या संघटनेच्या अध्यक्षा मनाली कांबळे यांनी सांगितले आहे.  

कोरोनाच्या मोहिमेत शासनाने या अंशकालीन स्त्री परिचरांना स्पेशल ड्युटीचे मानधन जाहीर केलेले आहे. पण या मानधनाची अजूनही प्रतिक्षा करावी लागत आहे. कोरोना काळासाठी या कर्मचाऱ्यांना कोणताही आरोग्य विमा देखील उतरविलेला नाही. तरीही या परिचर आपल्या सेवेचे कर्तव्य बजावत आहेत. याबाबत सातत्याने आरोग्य विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र उडावाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे पगार आज नियमित केले जात आहेत.

मात्र अंशकालीन स्त्री परिचर चे आरोग्य विभागाकडून नियमित पगार देखील खितपत ठेवण्यात आलेले आहेत. गेल्या जून ते ऑगस्टपर्यतचे नियमित पगार अजूनही झालेले नसल्याचे अध्यक्षा कांबळे यांनी सांगितले आहे. त्यामुळे लवकरात लवकर हे सर्व रखडलेले मानधन देण्यात यावे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा अंशकालीन स्त्री परिचर संघटनेच्या संघटक डॉ. सुरेखा पाटोळे व अध्यक्ष मनाली कांबळे यांनी दिला आहे.