जिल्ह्यात 379 ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकांच्या हाती

रत्नागिरी:- कोरोनामुळे निवडणुका घेणे शक्य नसल्याने, या परिस्थितीत ग्रामपंचायतींचा कारभार पाहण्याकरिता प्रशासक नेमण्याच्या झालेल्या कार्यवाहीनुसार आतापर्यंत जिल्ह्यातील 379 ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकांच्या हातात सोपवण्यात आला आहे.   

राज्य शासनाने 13 जुलै रोजी आदेश काढला. तसेच 14 जुलै रोजी एक परिपत्रक जारी करून त्या-त्या जिल्ह्यातील पालकमंत्र्यांशी समन्वय साधून प्रशासक नेमावेत, असे आदेश देण्यात आले होते. राज्यातील 19 जिल्ह्यातील जवळपास 1566 ग्रामपंचायतींच्या सरपंचांची मुदत ऑगस्टमध्ये संपला किंवा नजिकच्या काळात संपत आहे. कोरोनामुळे निवडणुका घेणे शक्य नसल्याने, या परिस्थितीत ग्रामपंचायतींचा कारभार पाहण्याकरिता प्रशासक नेमण्याचे अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍याना देणारा अध्यादेश काढण्यात आला होता.  

त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवर देखील प्रशासक नेमण्याची कार्यवाही पूर्णत्वास गेली आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या कार्यकारिणींमुळे आता त्या ग्रामपंचायतींच्या प्रशासकीय कारभाराची सर्व सूत्रे प्रशासकांच्या हातात सोपवण्यात आली आहे. जिल्ह्यात अशाप्रकारे 379 प्रशासक नेमण्यात आले आहेत. तर अजूनही डिसेंबर अखेर मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींवर 99 प्रशासक नेमण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.